रियाध : देशात 'भारत माता की जय'वरुन खल सुरु असताना मुस्लिम देश सौदी अरेबियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत 'भारत माता की जय'च्या घोषणांनी झालं. पंतप्रधान दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना राजधानी रियाधमध्ये मुस्लिम महिलांनी या घोषणा दिल्या.


 
सौदीतल्या टीसीएस वसाहतीला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. त्यावेळी ऑल वुमन आयटी आणि आयटीईएसच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मोदींना पाहून आनंदित झालेल्या मुस्लिम महिलांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. घोषणा देणाऱ्या बुरख्यातील महिला या सौदीच्या
रहिवासी असून त्यांना टीसीएसतर्फे ट्रेनिंग देण्यात आल्याची माहिती आहे.

 
सौदी अरेबियामध्ये मुस्लिम धर्मियांची मक्का आणि मदिना ही दोन पवित्र स्थळं आहेत. देशभरातून दरवर्षी लाखो मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी येतात. दारुल उलूम देवबंद यांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा देणं हे इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढला होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात झालेली घोषणाबाजी महत्त्वाची मानली जात आहे.

 
सौदी अरेबियाचा दौरा करणारे मोदी हे भारताचे चौथे पंतप्रधान आहेत. तेल उत्पादनात सौदी अरेबिया हा देश अग्रेसर आहे. जगाभरातल्या तेल उत्पादक देशांपैकी एकटा सौदी अरेबिया हा 16 टक्के तेलाची निर्मिती करतो.