वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) चं 'कॅसिनी' हे अंतराळ संशोधन यान शुक्रवारी शनी ग्रहाजवळ नष्ट झालं आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 5.25 वाजता हे यान शनी ग्रहाजवळ नष्ट झालं.

'कॅसिनी' या यानाने जवळपास 20 वर्ष शनी ग्रहाची परिक्रमा करुन, ग्रहावरील हलचालींचे फोटो नासाला पाठवले होते. 1997 मध्ये हे यान अंतराळात पाठवण्यात आलं होतं. 2004 मध्ये या यानाने शनीच्या वलंयाकृती कक्षेत प्रवेश केला.

यानंतर या यानाने आपल्या मोहीमेदरम्यान शनी ग्रहाचे 4 लाखपेक्षा जास्त फोटो काढले होते. तर या यानाने एकूण 4.9 अब्ज मैलाचा प्रवास पूर्ण करुन, अंतराळ मोहिमेतील सर्वात मोठी मोहीम फत्ते केली होती.


या यानाने काढलेल्या फोटोंमुळे शनी ग्रहावरील हलचालींचा अभ्यास करण्यात शास्त्रज्ञांना मदत झाली होती. शेवटच्या टप्प्यात या यानाचा वेग ताशी 1 लाख 22 हजार किलोमीटर इतका होता. यानंतर हे यान शनीजवळ गेल्यानंतर नष्ट झालं. यान नष्ट झाल्यानंतर 83 मिनिटांनी याची माहिती नासाला मिळाली.

नासाच्या या मोहिमेत एकूण 27 देशांचा सहभाग होता. तर मोहिमेवर आत्तापर्यंत 3.9 अब्ज डॉलर इतका खर्च झाला होता. नासासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी मोहिम असल्याचं मोहिमेचे प्रबंधक अर्ल मेज यांनी यानंतर बोलताना सांगितलं.