Bucha Massacre : युक्रेनच्या बुचा शहरात रशियन सैन्याने नरसंहाराचा भारताने निषेध केला असून त्याबद्दल चिंता व्यक्त करत निष्पक्ष तपासाचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पहिल्यांदाच रशियाविरोधात आपली प्रतिक्रिया दिली आहे. परिषदेत भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, 'बुचा येथील नरसंहाराचे अहवाल अतिशय अस्वस्थ करणारे आहेत. आम्ही बुचा शहरातील नागरिकांच्या हत्येचा स्पष्टपणे निषेध करतो आणि स्वतंत्र तपासासाठी पाठिंबा देण्याची मागणी करतो.' हिंसाचार आणि युद्ध लवकर संपावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
'युद्धाचा परिणाम इतर देशांवरही होतोय'
तिरुमूर्ती म्हणाले की, युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल भारत खूप चिंतेत आहे. ते म्हणाले की, युक्रेन संकटाचा परिणाम आता जगभर जाणवत आहे. त्यामुळे अन्न आणि उर्जेसंदर्भातील वस्तू महाग होत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम विकसनशील देशांवर होत आहे. तिरुमूर्ती म्हणाले की, 'जेव्हा निष्पाप लोकांचे जीव धोक्यात येतात, तेव्हा मुत्सद्देगिरी हा एकमेव पर्याय असतो.'
बुचा हत्याकांडावर रशियावर निशाणा
दरम्यान, अमेरिका आणि त्याच्या इतर मित्र राष्ट्रांनी बुचा नरसंहारावरून रशियाला घेरलं आहे. ब्रिटनने तर रशियाच्या नागरिकांना आवाहन केले आणि त्यांनी आपल्या सरकारकडून सत्य जाणून घ्यावे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुतिन यांनी आपल्या नागरिकांपासून सत्य लपवल्याचा आरोप केला. दुसरीकडे, परिषदेला संबोधित करताना संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, बुचा येथील नागरिकांच्या हत्येची भीषण दृश्य विसरणं शक्य नाही. त्यांनीही त्वरित निष्पक्ष चौकशीची मागणी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही रशियाचा तीव्र निषेध केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बुचा नरसंहाराचा व्हिडीओ आला समोर
बुचा हत्याकांडाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ 3 मार्चचा आहे. ड्रोनमधून घेतलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सायकल चालवताना दिसत आहे. काही अंतर चालून गेल्यावर हा माणूस त्या दिशेने वळतो जिथे रशियन सैन्याची चिलखती वाहने होती. ती व्यक्ती वळताच सैन्य त्याच्यावर हल्ला करते. हल्ल्यानंतर सायकलस्वार कुठेच दिसत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : बुचा शहरात रस्त्यांवर मृतदेहांचा खच, चर्चजवळ 45 फुट लांब स्मशानभूमी, सॅटेलाईट फोटोंमधून दिसला नरसंहार
- Russia Ukarine War : कीव्हमध्ये कहर, तब्बल 410 मृतदेह सापडले, राष्ट्राध्यक्षांचा रशियावर नरसंहाराचा आरोप
- रशिया ISIS पेक्षा वेगळा नाही, त्यांना सुरक्षा परिषदेतून बाहेर काढा; UNSC मध्ये झेलेन्स्की यांची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha