Coronavirus in UK :  ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद करण्यात आली. गुरुवारी ब्रिटनमध्ये 88 हजार 376 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. 


मागील 28 दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये कोरोनाबाधित असलेल्या 165 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतर ब्रिटनमध्ये दुसऱ्यांदा बाधितांची उच्चांकी नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये बुधवारी 78 हजार 610 बाधितांची नोंद करण्यात आली होती. याआधी 8 जानेवारी रोजी 68 हजार 053 बाधितांची नोंद करण्यात आली. त्यावेळी ब्रिटनमध्ये लॉकडाउन सुरू होता. जानेवारीत नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा ही संख्या 10 हजाराने अधिक आहे. 


कोरोनाचा सर्वात नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा ब्रिटनला मोठा धोका असल्याचे  ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेच्या प्रमुख डॉ. जेनी हॅरीस यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. ओमायक्रॉनचा फैलाव होत असल्याने बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


ब्रिटन सरकारने कोरोना लसीकरणावर पुन्हा भर देण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटन सरकारने लसीकरण झालेल्या नागरिकांना बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.


दरम्यान, राज्यात गुरुवारी 877 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 632   रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 95  हजार 249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. राज्यात गुरुवारी एकाही  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 25 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. तर, गुरुवारी 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.  राज्यात मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: