Google Employees Vaccination : मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीने जगभराची झोप उडवली आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली असून कित्येकांना जीवही गमवावा लागला आहे. पण लसीकरण ही एक मोठी आशा या महामारीपासून वाचण्यासाठी जगातील आरोग्यकर्मींनी तयार केली आहे. पण अनेकजण लसीकरणाला अधिक महत्त्व देत नसल्याने आता शासनासह खाजगी कंपन्याही पावलं उचलत आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने देखील कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन घेणं अनिवार्य करत, लसीकरण न करणाऱ्यांचे पगार कापण्याचा निर्णय़ घेतला आहे. तसंच संबधित कर्मचाऱ्यांची नोकरीही धोक्यात येऊ शकते, अशी माहितीही समोर येत आहे. 

  

मागील काही महिन्यांत कोरोनाचा प्रसार काहीसा कमी झाल्याचं वाटत होतं. पण त्यातच ओमायक्रॉन या नव्या विषाणूनं जन्म घेतल्यानं सर्व जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. त्यामुळेच गुगलने कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 'ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही, त्यांनी त्वरीत लसीकरण करुन घ्या. अन्यथा पगार कपात कऱण्यासोबत नोकरीवरुनंही कमी करण्यात येईल.'


18 जानेवारी अंतिम तारीख 


गुगलकडून कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबतचं प्रमाणपत्र 3 डिसेंबरपर्यंत सादर करण्यात सांगितलं होतं. पण आता ही तारीख वाढवून 18 जानेवारी केली आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार 3 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांकडून लसीकरण प्रमाणपत्राची वाट पाहणार. त्यानंतर लसीकरण न झालेल्यांशी संपर्क करण्यास सुरुवात करणार. ज्यानंतर लसीकरण न झालेल्यांना 30 दिवसांच्या पेड एडमिनिस्ट्रेटिव सुट्टीवर ठेवणार. ज्यानंतर 6 महिन्यांच्या बिनपगारी सुट्टीवर पाठवले जाईल. त्यानंतरही लसीकरण न करणाऱ्यांना थेट नोकरीवरुन कमी केले जाणार असल्याचं गुगलने म्हटलं आहे.


इतर बातम्या :