Omicron Outbreak in China: चीनमध्ये सोमवारी ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळलाय. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचं वृत्त दिले आहे. CGTN या स्थानिक प्रसारमाध्यमांनी सोमवारी चीनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याचे वृत्त दिले आहे. 2019 मध्ये चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा उगम झाला होता. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जगभराचं टेन्शन वाढवलं आहे. विदेशातून उत्तर चीनमध्ये आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 


CGTN या स्थानिक प्रसारमाध्यामाने ट्वीट करत चीनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याचं सांगितलं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलेय की, " सोमवारी चीनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. उत्तर चीनमधील थियानजिनमध्ये विदेशातून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं स्पष्ट झालेय."
 
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच  WHO ने 27 नोव्हेंबर रोजी या व्हेरियंटचं नामकरण ओमायक्रॉन (B.1.1.529) असं केलं आहे. हा व्हेरियंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकामध्ये आढळला होता. त्यानंतर जगभरात अतिशय वेगानं पसरत आहे. प्रत्येक देशानं विदेशातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवली आहे. विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जात असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉन या व्हिरेयंटबाबत जगाला सावध राहण्याचा सल्ला दिलाय. दक्षिण आफ्रिकाशिवाय, युरोप, कॅनडा, इस्राइल आणि हाँगकाँगमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय. आधीच्या कोरोना व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरियंटचा अधिक वेगानं संसर्ग होत आहे. तसेच हा व्हेरियंट रोग प्रतिकारकशक्तीवर थेट हल्ला करु शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय. 


 ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात पहिला बळी
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी युकेमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन किमान एका रुग्णाचा जीव गेल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटही जीवघेणा असल्याचे समोर आल्याने जगभरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. बोरिस यांनी वेस्ट लंडनमधील पॅडिंग्टन येथे एका लसीकरण क्लिनीकला भेट देण्यासाठी आले असताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,''दुर्देवाने ओमायक्रॉन चिंता वाढवत असून या व्हेरियंटची लागण झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसंच किमान एका व्यक्तीचातरी आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण होऊन मृत्यू झाला''