Britain News Update : जगभरात कोरोनाचा कहर कायम आहे. प्रत्येक देशात कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतातील जनता कोविड निर्बंधाबाबत फारशी गंभीर नसल्याचं पाहायला मिळालं. भारतात नागरिक नियम मोडताना दिसून येतात आणि ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे तेही याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ब्रिटनमध्ये परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ब्रिटनमध्ये चक्क पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. 


ही घटना 19 जून 2021 रोजी घडली. कोरोना निर्बंध असताना बोरिस जॉनसन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता या प्रकरणात पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरल्यानंतर जॉनसन यांनी या चुकीबद्दल माफीही मागितली आहे. दरम्यान, जॉनसन यांच्या दंडाची रक्कम किती आहे याबाबत  अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही. यामुळे बोरिस जॉनसन कार्यकाळात असताना नियमांचे उल्लंघन करणारे आणि दंडाला सामोरे जाणारे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान बनले आहेत.


जॉनसन यांचा राजीनामा देण्यास नकार
ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये जेव्हा कोरोनाची लाट शिगेला पोहोचली होती. तेव्हा 19 जूनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये जॉनसन कोरोना नियमांचं उल्लंघन करत पार्टी करताना दिसत होते. या प्रकरणावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता दंड ठोठावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर पुन्हा आवाज उठवत राजीनाम्याची मागणी केली आहे. जॉनसन यांनी दंड भरत जनतेची माफीही मागितली आहे आणि राजीनामा देण्यास नकार दिला आहे. 


लोकांमध्ये संताप दिसून आला
पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या पार्टीची बातमी समोर येताच ब्रिटनच्या जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला होता. 'सामान्य लोक त्यांच्या घरात कैद असताना पंतप्रधान स्वतः आनंद साजरा करत आहेत', अशी टीका ब्रिटनच्या जनतेकडून करण्यात येत होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha