Britain Political Crisis: ब्रिटनमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसातच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर त्यांनी म्हटले आहे की, संकटाच्या वेळी मी हे पद स्वीकारले होते. पण जनादेशाची अंमलबजावणी करू शकले नाही. याच्या एक दिवस आधी भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही राजीनामा दिला होता. त्याआधीच अर्थमंत्र्यांची हकालपट्टी झाली. अशा प्रकारे ब्रिटनमध्ये राजकीय पेच सुरू आहे.


स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आता पुढील आठवड्यात ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक होऊ शकते. लिझ ट्रस यांचा ब्रिटनमधील कार्यकाळ हा आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांच्या तुलनेत सर्वात कमी राहिला आहे. याचदरम्यान ब्रिटनचे विरोधी कामगार नेते केयर स्टारमर यांनी आता सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. यूकेमध्ये जोपर्यंत नवीन पंतप्रधान निवडला जात नाही, तोपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान राहतील. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच केली होती. त्यांच्यावर खूप दबाव होता.

आता नियमांनुसार, टोरी खासदार जे नेते बनू इच्छितात ते त्यांच्या मित्रपक्षांकडून उमेदवारी मागतील. यानंतर दोन उमेदवार निवडले जातील. ज्यामध्ये रँक आणि फाइल कंझर्व्हेटिव्हचे सदस्य विजेत्याची निवड करतील. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, काही खासदारांची इच्छा आहे की, लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर लवकरात लवकर नवीन पंतप्रधानांची निवड करावी. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर नेतृत्वाची स्पर्धा सुरू झाली आहे. आता जे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत त्या खासदारांनी आपल्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, टोरी संसदीय पक्ष नेतृत्वासाठी एकच उमेदवार पुढे केला जाऊ शकतो. यातच लेब आणि लिबरल डेमोक्रॅट्सला देशात लवकर सार्वत्रिक निवडणुका हव्या आहेत. मात्र सरकार जानेवारी 2025 पूर्वी दुसरी निवडणूक घेण्यास बांधील नाही.


नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोणाच्या नावाची आहे चर्चा? 


नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या सोबतच माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, पेनी मॉर्डेंट, बेन वॉलेस यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या खासदारांमध्ये सुनक हे आजही सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे बोलले जात आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नियमांनुसार, नवीन नेत्याला पंतप्रधान झाल्यानंतर किमान एक वर्ष अधिकृत प्रक्रियेद्वारे आव्हान दिले जाऊ शकत नाही. त्यामुळेच खासदारांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची पत्रे सादर केली आहेत. अशी बरीच पत्रे मिळाल्यास, 1922 च्या समितीचे नेतृत्व सर ग्रॅहम ब्रॅडी-निवडणूक प्रक्रियेचे नियम बदलू शकतील. ज्यात दोन उमेदवारांची एक शॉर्टलिस्ट तयार केली जाऊ शकते. यानंतर त्यांच्यापैकी एकाला पुढचा पंतप्रधान बनवले जाईल. त्यानंतर पक्षाच्या सदस्यांच्या मदतीशिवाय टोरी खासदार कोण पंतप्रधान आणि कोण उपपंतप्रधान बनणार हे ठरवतील.