Israeli Parliament Passes Netanyahu's Judicial Overhaul bill: देशातील धर्मांध राजकीय सत्तेला देशाची निष्पक्ष आणि उदारमतवादी न्यायव्यवस्था राजकीय फायद्यासाठी अवघड जागेचं दुखणं वाटू लागल्याने इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय संसदेत बदलण्यासाठी दंड थोपटले आहेत. देशाच्या नेसेटमध्ये (संसद) सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवणाऱ्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सरकारच्या दंडेलशाहीविरोधात जनता उतरली असतानाच आता देशातील प्रमुख चार दैनिकांनी सरकारच्या निर्णयाविरोधात मंगळवारी पहिलं पान पूर्णत: काळ्या शाईत छापत निषेध केला. या दैनिकांनी काळ्या पानावर “इस्रायली लोकशाहीसाठी काळा दिवस" इतकाच मजकूर पानाच्या शेवटी छापला होता. देशातील हाय-टेक कंपन्यांनी यासाठी सहकार्य केले.
देशात आगडोंब सुरु असतानाही विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याने आणखी पारा चढला आहे. हजारो इस्रायली डॉक्टरांनी काम सोडून दिले आहे. कामगार नेत्यांनी संपाची धमकी दिली आहे. वरिष्ठ न्यायमूर्तींनी मंगळवारी परदेश दौर्यावरून घरी धाव घेतली. सरकारने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करणारा कायदा मंजूर केल्याच्या एका दिवसानंतर, टीकाकारांनी देशातील समतोल नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या फुटीरतावादी न्यायिक फेरबदलाच्या मालिकेतील पहिल्या उपायांवर सोमवारचे मतदान देशभरात गाजले. सात महिन्यांच्या कडाडून विरोधानंतरही नेतान्याहू यांनी विधेयक मांडले.
विरोधकांनी 'शेम' 'शेम' अशा घोषणा देत सभागृहातून काढता पाय घेतला. सनातनी वृत्तीच्या राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या आघाडीने हे विधेयक एकमताने मंजूर केले. परंतु विरोधकांनी अजून हार मानलेली नाही. नागरी हक्क गटांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करत नवीन कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच निदर्शने देशाच्या रस्त्यावर पुन्हा सुरू झाली आहेत.
तेल अवीवमध्ये रात्रभर टायर जाळले
लाखो लोकांनी तेल अवीवमध्ये रात्रभर टायर जाळून निष करत राष्ट्रध्वज फडकवले. मध्य जेरुसलेममध्ये, घोड्यांवर बसलेल्या पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे सोडत दुर्गंधीयुक्त स्प्रे सोडले. जवळपास 40 लोकांना अटक केली. व्हिडिओंमध्ये पोलिस अधिकारी आंदोलकांना फरपटत नेताना, लोकांना रक्तस्त्राव होईपर्यंत मारहाण करताना आणि लाठीने हिंसकपणे त्यांना मागे ढकलताना दिसून येत आहेत. किमान 10 अधिकारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लष्करी राखीव दलातील हजारो अधिकार्यांचाही विरोध
लष्करी राखीव दलातील हजारो अधिकार्यांनी यापुढे स्वैच्छिक सेवेसाठी वळणार नसल्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे देशाच्या ऑपरेशनल तयारीला हानी पोहोचू शकते. यानंतर इस्त्रायलच्या सैन्याने शिस्तभंगाची कारवाई करताना एका अधिकाऱ्याला 1,000 शेकेल ($270) दंड ठोठावला आहे. दुसर्याला कॉल-अप्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल निलंबित करून 15 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. सरकारच्या मग्रुरीने इस्रायली समाजात खोल फूट पडली आहे. अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. उच्च तंत्रज्ञानातील व्यावसायिक स्थलांतराचा विचार करत आहेत. इस्त्रायली मेडिकल असोसिएशनने संप जाहीर केला आहे. त्यांचे सदस्य केवळ आपत्कालीन परिस्थिती आणि गंभीर काळजीच्या गरजा हाताळतील.
इतर महत्वाच्या बातम्या