Turkey Mine Blast : उत्तर तुर्कीतील (Turkey) कोळसा खाणीत स्फोट (Turkey Mine Blast News) झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, उत्तर तुर्कीमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात किमान 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. स्फोटाची भीषणता (Mine Blast News) फारच गंभीर होती.
कुठे आणि कसा झाला स्फोट?
बार्टिनच्या काळ्या समुद्र किनारी प्रांतातील अमासरा शहरातील सरकारी टीटीके अमासरा मुसेसे मुडुर्लुगु खाणीत शुक्रवारी हा भीषण स्फोट झाला. तुर्कीचे ऊर्जामंत्री फातिह डोनमेझ यांनी सांगितलं की, प्राथमिक अंदाजानुसार, हा स्फोट फायरएम्पमुळे झाला असावा. तसेच, या स्फोटात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
'स्फोटाच्या वेळी खाणीत 110 लोक उपस्थित'
शुक्रवारी हा स्फोट झाला असून अद्याप बचाव कार्य सुरु आहे. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी खाणीत तब्बल 110 लोक उपस्थित होते. तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी खाणीत 110 लोक उपस्थित होते. स्फोटानंतर बहुतेक कामगार पळून जाण्यात यशस्वी झाले. पण अनेकजण खाणीबाहेर पडता न आल्यानं खाणीतच अडकून पडले. त्याली काहीजणांनी आपले प्राण गमावले, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. 49 लोक अतिजोखमीच्या भागात अडकले होते. सुलेमान सोयलू यांनी अद्याप आत अडकलेल्या लोकांची संख्या दिलेली नाही. दरम्यान, 49 पैकी काहींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
आज तुर्कीचे राष्ट्रपती अपघात स्थळाला भेट देणार
कोळसा खाणीतील स्फोटात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विटरवर दिली आहे. खाणीतील दुर्घटनेमुळे किती लोक जखमी झाले हे त्यांनी सांगितलं नाही, मात्र आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. तुर्कस्तानची आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीनं अपघाताबाबत माहिती देताना सांगितलं की, शेजारील प्रांतांसह अनेक बचाव पथकं या भागांत पाठवण्यात आली आहेत. यासह तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन शनिवारी अपघातस्थळी पोहोचतील.