Bangladesh Violence: नवी दिल्ली : बांग्लादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. रविवारी घडलेल्या हिंसक घटनेत तब्बल 91 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, आतापर्यंत या हिंसारात शेकडो लोक जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांग्लादेशात (Bangladesh Violence Updates) पुन्हा मोठा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर या घटनेला मोठं हिंसक वळण मिळालं.
दरम्यान, या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आलं आहे. तसेच, भारत सरकारनंही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच, येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी बांग्लादेशात विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. तसेच, स्टन ग्रेनेडचा वापर केला. त्यानंतर बांग्लादेश सरकारनं रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी कर्फ्यू जाहीर केला. गेल्या महिन्यात निदर्शनं सुरू झाल्यापासून सरकारने हे पाऊल उचललं आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रविवारी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले होते. यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. एवढंच नाहीतर, काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह, काही कार्यालयं आणि आस्थापनांवरही हल्ले केले. विशेष म्हणजे, काही आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात जमले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
देशभरात किमान 200 लोकांचा मृत्यू
सरकारी नोकऱ्यांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी बांग्लादेशातील विद्यार्थी एका महिन्याहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात यापूर्वीही हिंसाचार उसळला असून देशभरात आतापर्यंत किमान 200 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बांग्लादेशची राजधानी ढाका हे आंदोलनाचं केंद्र बनलं आहे.
हिंसाचार थांबवा, संवाद सुरू करा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, बांग्लादेशचे नेते आणि सुरक्षा दलांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. वोल्कर म्हणाले की, सरकारनं निदर्शनांमध्ये शांततापूर्ण सहभागींना लक्ष्य करणं थांबवावं, अनियंत्रितपणे ताब्यात घेतलेल्यांना ताबडतोब सोडावं, इंटरनेट सेवा सुरळीत सुरू करावी, असं आवाहन केल्याची माहिती बीबीसीनं दिली आहे.
यापूर्वी जुलैमध्येही उफाळलेली हिंसा
वृत्तसंस्था एपीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अनेक वाहनांनाही आग लावली. माध्यमांशी बोलताना ढाक्याच्या मुन्शीगंज जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं की, "संपूर्ण शहर युद्धभूमीत बदललं आहे. आंदोलक नेत्यांनी आंदोलकांना बांबूच्या काठ्यांसह सशस्त्र होण्याचं आवाहन केलं होतं, कारण जुलैमध्ये झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केला होता. बांग्लादेशमधील माध्यमांनी दिलेल्या माध्यमांनुसार, बोगुरा, मागुरा, रंगपूर आणि सिराजगंजसह 11 जिल्ह्यांमध्ये मृत्यू झाला, जिथे अवामी लीग आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सदस्य थेट भिडले होते.