Bangladesh PM Sheikh Hasina Resignation: ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh Violance) पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन, त्या सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्या.  शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं देश सोडला असून त्या दोघीही सुरक्षित स्थळी निघून गेल्या आहेत.


बांगलादेशात सध्या अस्थिर वातावरण आहे. यामुळेच त्यांनी बांगलादेश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याची माहिती मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू आहे. पंतप्रधान शेख हसीना भारताच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.  विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला.


मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणावरुन वादंग सुरु आहे. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. 


पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा


बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.


राजधानी ढाक्यासह देशभरात सैन्य मैदानात


शेख हसीना यांच्या मुलाने सुरक्षा दलांना आवाहन केलं होतं की, राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर सैन्याने अलर्ट राहावं. त्या पार्श्वभूमीवर ढाक्यासह देशभरात सैन्य तैनात करण्यात आलं होतं.


बांगलादेशमधील अस्थिरतेचे नेमके कारण काय? 


शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.                              


यापूर्वी जुलैमध्येही उफाळलेली हिंसा 


वृत्तसंस्था एपीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अनेक वाहनांनाही आग लावली. माध्यमांशी बोलताना ढाक्याच्या मुन्शीगंज जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं की, "संपूर्ण शहर युद्धभूमीत बदललं आहे. आंदोलक नेत्यांनी आंदोलकांना बांबूच्या काठ्यांसह सशस्त्र होण्याचं आवाहन केलं होतं, कारण जुलैमध्ये झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केला होता. बांग्लादेशमधील माध्यमांनी दिलेल्या माध्यमांनुसार, बोगुरा, मागुरा, रंगपूर आणि सिराजगंजसह 11 जिल्ह्यांमध्ये मृत्यू झाला, जिथे अवामी लीग आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सदस्य थेट भिडले होते.


बांगलादेशचे लष्करप्रमुख काय म्हणाले? 


बांगलादेश लष्करप्रमुख वकार-उर-झमान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ⁠अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. सर्वांनी संयमी राहावे. आम्ही अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. सर्वांनी शांतता राखावी. हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. प्रत्येक हत्या आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांचा गांभीर्याने विचार केला जाईल.  सर्व पक्षांचे नेते एकत्रितपणे आले होते आणि चांगली गोष्ट घडली आहे.  सर्वपक्षीय बैठकीत अवामी लीगचे कोणीही नव्हतं.  पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. आम्ही अध्यक्षांशी बोलू.  तुम्ही हिंसाचार करणार नाही,आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.