Bangladesh Violence: नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये (Bangladesh) प्रचंड अस्थिरता पसरलीये. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांनंतर शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी आज अखेर राजीनामा दिला, आणि त्यानंतर काही मिनिटांत त्यांनी देश सोडला. अशातच आता शेख हसीना यांच्या मुलाचं एक वक्तव्य सध्या समोर आलं आहे. शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय (Sajeeb Wazed) यांनी आपली आई राजकारणात परतणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांची आई शेख हसीना त्यांच्या नेतृत्वाविरूद्ध अलीकडील बंडांमुळे 'खूप निराश' झाली होती. ते म्हणाले की, बांगलादेशात सुधारणा करण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण प्रयत्न असूनही त्यांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. जॉय यांच्या म्हणण्यानुसार, विरोधामुळे ती आधीच राजीनामा देण्याचा विचार करत होती.
किंबहुना गेल्या काही दिवसांपासून कोटा पद्धतीच्या विरोधात संपूर्ण बांगलादेशात निदर्शनं सुरू होती. शेख हसीना यांनी संचारबंदी लागू केल्यानंतर आणि लष्कर रस्त्यावर उतरल्यानंतर निदर्शनं शांत झाली. काही दिवसांनंतर, निदर्शनास हिंसक वळण लागलं आणि देशभरात हिंसाचार दिसून आला आणि आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास सुरुवात केली. यानंतर शेख हसीना यांना आपलं पद आणि देश सोडावा लागला.
शेख हसीना यांच्या मुलाकडून कार्यकाळाचा बचाव
शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी सांगितलं की, सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबानं त्यांना देश सोडण्याचं आवाहन केलं होतं. जॉय यांनी आपल्या आईच्या कार्यकाळाचा बचाव करताना सांगितलं की, "त्यांनी बांगलादेशचा कायापालट केला आहे. जेव्हा त्यांनी सत्ता हाती घेतली, तेव्हा तो एक अयशस्वी देश मानला जात होता. तो एक गरीब देश होता. आज तो आशियातील विकसनशील देशांपैकी एक मानला जातो."
हसीना यांच्या मुलानं कोटा पद्धतीविरोधातील आंदोलन दडपण्यासाठी हसीना सरकारच्या प्रयत्नांचाही बचाव केला. उदाहरणार्थ, कर्फ्यूद्वारे निदर्शनं संपवण्याचा प्रयत्न, पाहताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश आणि आंदोलकांवर बळाचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये काही पोलिसांनाही प्राण गमवावे लागले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उचललेली पावलं आवश्यक असल्याचं शेख हसीना यांच्या मुलानं सांगितलं आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर शेख हसीना बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खुद्द लष्करप्रमुखांनीच याची घोषणा केली आहे. तसेच, विविध राजकीय पक्षांशी बोलणी केल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याचं वृत्त आहे. यामध्ये बीएनपी, नागरीक एक्य, राष्ट्रीय पक्ष, हेफाजेत इस्लाम, जमात-ए-इस्लामी आणि इतर काही गटांचा समावेश होता.
बांगलादेशमधील अस्थिरतेचं नेमकं कारण काय?
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.