Bangladesh Protest: सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं. त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थेट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं. सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही. तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली. या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे. आज भारत सरकारच्या वतीनं संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.


बांगलादेशच्या माध्यमांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार, देशात सत्तापालट झाल्यानंतर परिस्थिती आणि व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, देशातील तुरुंगही रिकामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, सोमवारी हिंसक आंदोलकांनी कर्फ्यु झुगारुन शेख हसीना यांच्या घराला घेराव घातला. एवढंच काय तर, कर्फ्यु दरम्यानच शेरपूर कारागृहात हल्लेखोर लाठ्या घेऊन घुसले आणि सुमारे 500 कैद्यांना कारागृहातून बाहेर काढले. 


आंदोलकांकडून जाळपोळ 


आंदोलकांनी शेरपूरच्या कारागृहातच नव्हे तर दमदमा कालीगंज परिसरातही घुसून आग लावली. शेरपूरचे उपायुक्त अब्दुल्ला अल खैरुन यांनी सांगितलं की, सायंकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी कारागृहावर हल्ला केला. सोमवारी संतप्त जमावानं केवळ जेलच नव्हे तर पोलीस ठाण्यांनाही लक्ष्य केलं. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याला हल्लेखोरांनी आग लावली. याशिवाय जिल्हा परिषद, जिल्हा निवडणूक कार्यालय, सोनाली बँक तसेच अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली.


शेख हसीना भारतात आश्रयाला 


सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत, देशाबाहेर पलायन केलं. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे. भारतात काही दिवस आश्रय घेतल्यानंतर शेख हसीना इंग्लंडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशात सुरू असलेला गोंधळ हा केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुरता मर्यादित नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. बांगलादेशात एका नव्या शक्तीचा जन्म झाला आहे, असं वक्तव्य पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी केलं आहे. त्यांच्या सांगण्यावरून घटना घडत आहेत. यादरम्यान, देशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या पक्षाशी संबंधित लोक बांगलादेशात गोंधळ घालत असल्याचं बोललं जात आहे.  


बांगलादेशातील हिंसाचाराचं नेमकं कारण काय?


1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करण्याच्या मागणीसह गेल्या महिन्यात सुरू झालेल्या आंदोलनाचे नंतर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये रूपांतर झाले. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर, देशभरातील उत्साही जनसमुदाय त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला.