Bangladesh Fire : बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथील सात मजली इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि काही वेळातच ती वरच्या मजल्यांवर वेगाने पसरू लागली.


 


43 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी 


बांगलादेशची राजधानी ढाका येथील सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री 9.50 वाजता ही आग लागली. काही वेळातच आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरू लागली.



इमारतीत 75 लोक अडकले


याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की आगीमुळे इमारतीत 75 लोक अडकले होते, त्यापैकी 42 बेशुद्ध झाले होते. या लोकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी हजर असल्याचे सांगण्यात येत आहे.


 


मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता 


याबाबत बांगलादेशचे आरोग्य मंत्री डॉ सामंत लाल सेन यांनी सांगितले की, ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळच्या शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न आणि प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटलमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्णालयांमध्ये 22 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जे वाचले त्यांच्या श्वसनसंस्थेला मोठा फटका बसला. त्याचबरोबर अनेक मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.


 


'जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या काचा फोडून खाली उडी मारावी लागली'


सुरूवातीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याने लोक घाबरले आणि वरच्या मजल्याकडे धावले, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. नंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिडीचा वापर करून इमारतीच्या वरच्या मजल्यावरून अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. एका पीडितेने सांगितले की, आग लागल्यानंतर मी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली. जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या काचा फोडून खाली उडी मारावी लागल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.


 


हेही वाचा>>>


India Maldives :  मालदीवने भारतीय वैमानिकांना दिली 'ही' परवानगी, चीनला मिरच्या झोंबणार, राजनैतिक तणावादरम्यान भारताला मोठा विजय