India Maldives : मालदीवसोबत सुरू असलेल्या राजनैतिक तणावादरम्यान भारताला (India) मोठा विजय मिळाला आहे. मालदीवने भारतीय वैमानिकांना मालदीवमध्ये हेलिकॉप्टर चालवण्याची परवानगी दिली आहे. मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आरोग्य सुविधांच्या उद्देशाने भारताने मालदीवला दिलेले हेलिकॉप्टर चालवण्यासाठी भारतीय नागरिकांचा एक गट मालदीवमध्ये येत आहे.
दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव शिगेला
मालदीवमध्ये भारतीय नागरिकांची उपस्थिती महत्त्वाची आहे. कारण हिंद महासागरात वसलेला मालदीव भारतासाठी महत्त्वाचा आहे. राजनैतिक परिभाषेत हिंदी महासागराला भारताचा बॅकयार्ड असे म्हणतात. याशिवाय मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू यांचे सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव शिगेला पोहोचला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू आणि त्यांचा पक्ष चीन समर्थक असल्याचे म्हटले जाते. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना देश सोडण्याची मागणी केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळेच राजनैतिक तणावादरम्यान भारताला मोठा विजय मिळाल्याचं सांगण्यात येतंय.
आज रात्रीपासून हस्तांतराची प्रक्रिया
मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, भारतीय नागरिक मालदीवमध्ये हेलिकॉप्टर चालवण्यासाठी अड्डू शहरात येत आहेत. GAN विमानतळावर हेलिकॉप्टर आहे. अहवालानुसार, भारतीय वैमानिक आज रात्री GAN विमानतळावर पोहोचतील, त्यानंतर भारतीय नागरिकांना हेलिकॉप्टर चालवण्याचे काम देण्याची प्रक्रिया सुरू होईल. हे सर्व नागरिक मालदीवमध्ये तैनात असलेल्या सध्याच्या लष्करी जवानांची जबाबदारी स्वीकारतील आणि भारत सरकारने प्रदान केलेल्या हेलिकॉप्टरचे संचालन करतील. यासोबतच मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने असेही जाहीर केलंय की सध्या लामू गण काधधू विमानतळावर तैनात असलेले हेलिकॉप्टर देखभालीसाठी भारतात परत पाठवले जाईल. बदली हेलिकॉप्टर उद्या म्हणजेच बुधवारी मालदीवमध्ये पोहोचेल.
मालदीवच्या मदतीसाठी बजेटमध्ये वाढ
सरकारी आकडेवारीनुसार, भारताने 2023-24 या आर्थिक वर्षात म्हणजेच मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात मालदीवमधील विकास प्रकल्पांवर सुमारे 7.71 अब्ज रुपये खर्च केले आहेत. हा खर्च नियोजित बजेटच्या जवळपास दुप्पट आहे. याशिवाय 2024-25 या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मालदीवसाठी 6 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण नंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मालदीवसाठी तरतूद केलेल्या बजेटमध्ये सुधारणा करून त्यात वाढ करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक बजेटमध्ये मालदीवसाठी अंदाजे 7.8 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा>>>
Israel-Hamas War: इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेले युद्ध आता संपणार का? रमजानच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामावरील करार