इस्तंबुल : धावत्या रेल्वेमध्ये किंवा वाहनात गर्भवतींच्या प्रसुतीच्या घटना ऐकायला मिळतात. मात्र तुर्किश एअरलाईन्सच्या विमानातील प्रवाशांनी तब्बल 42 हजार फूट उंचीवर नव्या पाहुण्याचं स्वागत केलं. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेने विमानातच बाळाला जन्म दिला.


नफी दायाबी नामक महिलेने रविवारी तुर्किश एअरलाईन्सच्या विमानात मुलीला जन्म दिला. 28 आठवड्यांची गर्भवती असलेल्या नफीला विमानाने टेक ऑफ करताच प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यानंतर विमानातील केबिन क्रू आणि काही प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसुती करण्यात आली.



बाळाचा जन्म झाला त्यावेळी विमान 42 हजार फूट उंचीवर होतं. गिनिआची राजधानी असलेल्या कोनाक्री शहरातून विमानाने उड्डाण केलं होतं. विमान ओऊगादोगू मार्गे इस्तांबूलला गेलं. तुर्किश एअरलाईन्सने ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली. त्याचप्रमाणे महिलेला मदत करणाऱ्या क्रूचं कंपनीने विशेष अभिनंदनही केलं आहे.

https://twitter.com/TurkishAirlines/status/850348200078737411

विमान लँड झाल्यानंतर बाळ आणि बाळंतीणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीचं नामकरण काडिजू असं करण्यात आलं असून मायलेकीची प्रकृती स्थिर आहे.