ब्रिस्बेन (क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठात (University of Queensland) कोरोना व्हायरस प्रतिबंधक (coronavirus vaccine) लसींच्या मानवी चाचण्यांना सुरुवात झालीय. या चाचण्यांमध्ये 120 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांताच्या पंतप्रधान अॅनास्थेशिया पलाशे (Annastacia Palaszczuk) यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली.


क्वीन्सलँड विद्यापीठातील मानवी चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आले तर कोविड-19 पासून जगाचं संरक्षण होईलच शिवाय क्वीन्सलँडच्या अर्थव्यवस्थेला उभारी येईल, असं पलाशे यांनी सांगितलं.


क्वीन्सलँड विद्यापीठाने बनवलेल्या लसीचे प्राण्यांवरील चाचण्यांचे निष्कर्ष खूपच सकारात्मक आहेत, त्यामुळे संशोधकाचं मनोबल वाढलं आहे. क्वीन्सलँड विद्यापीठाच्या लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या नेदरलँडमध्ये झाल्या आहेत.


क्वीन्सलँडच्या पंतप्रधान अनास्थेशिया पलाशे यांनी कोरोना लसीबाबतच्या संशोधनासाठी विद्यापीठाची प्रशंसा करतानाच, त्यांच्या चाचणीचा आज पहिलाच दिवस असल्याने आत्ताच त्याच्या निष्कर्षांवर बोलणं घाईचं होईल असंही त्या म्हणाल्या.


कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनासाठी क्वीन्सलँडने मार्च महिन्यापासून सुरुवात केली असल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, या संशोधनासाठी क्वीन्सलँड सरकारने विद्यापीठाला एक कोटी डॉलर्सचा निधी दिला आहे. क्वीन्सलँड विद्यापीठातील कोरोना लसीच्या मानवी चाचण्या आणि प्रत्यक्षात लस तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी अपेक्षित असल्याचंही पंतप्रधान पलाशे यांनी सांगितलं.


या मानवी चाचण्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना दर चार आठवड्यांनी या लसीचे दोन डोस इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जातील. या चाचणीत सहभागी झालेले स्वयंसेवक तब्बल 12 महिने निरीक्षणाखाली असतील. या लसीमुळे तयार होणारी रोगप्रतिकारक क्षमतेची सातत्याने चाचपणी केली जाणार आहे. या चाचणीचे पहिले निष्कर्ष येण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


क्वीन्सलँड विद्यापीठातील कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधकांच्या टीमचे प्रमुख प्रा. पॉल यंग Dr. Paul Young यांनी सांगितलं की लोकांच्या वापरासाठी प्रत्यक्ष ही लस कधीपर्यंत तयार होईल हे आता सांगणं अवघड असलं तरी किमान वर्षभर तरी वाट पाहावी लागणार आहे.


रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने कालच कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. रशियाच्या स्पुटनिक या अधिकृत वृत्तसंस्थेने याविषयीची माहिती दिली होती. सर्व आवश्यक मानवी चाचण्या पूर्ण करणारी जगातील पहिली लस असल्याचा दावा रशियाने केला आहे.


भारतातही दोन कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. त्यापैकी एक असलेल्या भारत बायोटेकच्या लसीसोबत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था आणि आयसीएमआरचं सहकार्य मिळालं आहे. त्यासोबतच कॅडिला हेल्थकेअर ही औषध कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या करत आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


रशियातील विद्यापीठात कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी यशस्वी


कोरोना लसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 6 ते 9 महिने लागतील : डब्ल्यूएचओ


Corona Vaccine | भारत बायोटेक पाठोपाठ झायडस कॅडिला कंपनीच्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला परवानगी


COVID-19 Symptoms List | कोविड-19 ची तीन नवीन लक्षणे समोर!