मुंबई : भीषण आगीच्या वणव्यात अख्खा दक्षिण ऑस्ट्रेलिया होरपळून निघत आहे. मात्र अवघा देश आगीच्या झळा सोसत आहे. कारण, न्यू साऊथ वेल्समधल्या जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे जवळपास 48 कोटी प्राणी आणि पक्षांनी आपला जीव गमवला असून न्यू साऊथ वेल्स राज्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या आगीमध्ये फ्लिंडर्स चेस नॅशनस पार्क, कांगारु बेट भागातील 14 हजार हेक्टर क्षेत्र भस्मसात झालं आहे.


ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांच्या अनेक भागांत पेटलेल्या भीषण वणव्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारत दौरा रद्द केलाय. सध्या न्यू साऊथ वेल्समध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्कॉट मॉरिसन यांचा भारत दौरा रद्द केला आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेले वणवे हे जागतिक वातावरणीय बदलांचं प्रतिक आहे असं तेथील पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलं आहे. तसंच अजैविक इंधन जाळून होणारं प्रदूषण नियंत्रणात आणलं नाही तर ही परिस्थिती भविष्यात आणखी बिकट होईल असा इशाराही या पर्यावरण शास्त्रज्ञांनी दिला आहे.

आगीमुळे ऑस्ट्रेलियाच्या तापमानातही मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचं पाहायलं मिळतं आहे. यात मागील 125 वर्षातील उच्चांक न्यू साऊथ वेल्स या राज्याने तोडला आहे. सिडनीत 48 डिग्री सेल्सिअस एवढ्या उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे. मागील वर्षात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात, ब्राझिलच्या अॅमेझॉनमध्ये, रशियाच्या सायबेरियात आणि इंडोनेशियालाही आगीचा मोठा फटका बसला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार कोरडी हवा, दीर्घकाळ राहिलेला दुष्काळ, वाढतं तापमान आणि जोरदार वाऱ्यामुळे हे वणवे लागत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात पसरतांना पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून पूर्व आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तर ऑस्ट्रेलियातील मान्सून मंदावला आहे. दरम्यान, या ऑस्ट्रेलियातील आगीमुळे भारतातील मान्सूनवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

आगीमुळे जंगलांचे किती नुकसान?

न्यू साऊथ वेल्समधील 40 लाख हेक्टरचे जंगल भस्मसात

2018मध्ये कॅलिफोर्नियात 18 लाख हेक्टर जंगल उद्धवस्त

तर, 2019 मध्ये अॅमेझॉनचे 9 लाख हेक्टर क्षेत्र आगीने प्रभावित झाले.