काहिरा: इजिप्तच्या एका महिलेचे वजन तब्बल अर्धा टन, म्हणजे 500 किलो असल्याचे नोंदवण्यात आलं आहे. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, इमान अहम अब्दुलाती (वय.36)ने गेल्या 25 वर्षांपासून अलेक्झेंडरीयामधलं आपलं घर सोडलं नाही. सध्या ती आपल्या बेडवरुनही उठण्यास असमर्थ आहे. तिच्या लठ्ठपणामुळे तिला एका जागेवरुन हलताही येत नाही.
ती दैनंदिन क्रियेसाठी पूर्णपणे आपली आई आणि बहीण चायमा अब्दुलातीवर अवलंबून आहे. या दोघीही तिची रोज सुश्रूशा करतात. अल अलबेरियानुसार, इमानाच्या जन्मावेळी तिचे वजन 5 किलो होते. तिच्या जन्मानंतर ती हात्तीपाय सदृश्य रोगाने ग्रस्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हात्तीपाय हा एकप्रकारे परजीवी संक्रमण असून, ज्याने संपूर्ण अंग सुजतं.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरिरातील ग्रंथी नष्ट होण्याने, शरिरात पाणी जमा होऊ लागते. इमाना लहान असताना एखाद्या लहान मुलाप्रमाणेच खेळत-बागडत होती. मात्र, तिने 11 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर, तिच्या पायाच्या वजनामुळे तिला तिच्या पायावर उभे राहण्यास त्रास होऊ लागला. यानंतर तिने घरातच रांगण्यास सुरुवात केली.
त्यातच तिला अर्धांगवायूच्या झटका आल्यामुळे तिला शाळा सोडावी लागली. यानंतर ती आपल्या खोलीतून बाहेरच पडू शकली नाही. तसेच अनेक शारिरीक क्रिया करण्यासही ती असमर्थ ठरली. मृत्यूच्या भितीने तिच्या कुटुंबीयांनी एक ऑनलाईन याचिका दाखल करुन इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सीसीकडे वैद्यकीय सहकार्याची मागणी केली आहे.