Covishield Vaccine : ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या कोरोनाविरोधी लस म्हणजेच भारतात सीरम इन्स्टिट्यूट बनवित असलेली कोव्हिशिल्डबाबत चिंताजनक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल लॅन्सेट जर्नलमध्ये (The Lancet journal) प्रकाशित करण्यात आला आहे. ओमायक्रॉनच्या संकटात हा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे. लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या या अहवालात ब्राझील आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे. या संशोधनात ज्या लोकांनी कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून वाचण्यासाठी बुस्टर डोसची गरज असल्याचे म्हटले आहे. अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचे दोन डोस घेतलेले स्कॉटलंडचे 20 लाख आणि ब्राझीलच्या 4.2 कोटी लोकांचा डेटा गोळा करून त्यावर संशोधन करण्यात आले. कोव्हिशील्ड घेतल्यानंतर लशीचा परिणाम तीन महिन्यांतच कमी होऊ लागतो.
एडिनबर्ग विद्यापीठाच्या नेतृत्वात संशोधकाच्या एका टीमने म्हटले की, ज्यांनी कोविशिल्डचे दोन डोस घेतले आहे. त्यांना गंभीर संक्रमणापासून वाचण्यासाठी आणि बुस्टर डोसची गरज असल्याचे निष्कर्षातून समोर आलं आहे. ज्यांनी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा स्कॉटलंडमधील 20 लाख आणि ब्राझीलच्या 4.2 कोटी लोकांच्या डेटावर विश्लेषण करण्यात आलं आहे.
स्कॉटलँडमधील विश्लेषणानुसार, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दोन आठवड्याच्या तुलनेत पाच महिन्यानंतर अधिक धोका संभवतो. मृताचं प्रमाण अथवा रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण पाचपटीने जास्त असल्याचं समोर आलं आहे. तीन महिन्यानंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं समोर आलं आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका अथवा रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण दोन आठवड्यानंतर दुप्पट होतं. तर चार महिन्यानंतर तीनपट तर पाच महिन्यानंतर पाचपट धोका वाढतो. ब्राझिलमध्येही असेच काही संशोधनातून समोर आलं आहे.
कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी लसीकरण एक मोठ शस्त्र आहे. पण, कालांतराने लसीचा कमी होणारा प्रभाव काही दिवसांपासून चिंतेचा विषय ठरत आहे. एडिनबर्ग विद्यापीठातील प्रमुख प्रोफेसर अजीज शेख म्हणाले की, 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा प्रभाव केव्हापासून कमी होतो, हे ओळखून बूस्टर डोस प्रोग्राम डिझाइन करण्यावर विचार करावा. जेणेकरुन लोक अधिक सुरक्षित होतील. '