अटलांटामधील एका हायवेवरून एका डॉलर वाहून नेणाऱ्या गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने सगळे डॉलर हवेत उडाले. हवेत उडालेले हे डॉलर सर्व रस्त्यावर पसरले आणि ते गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका गाडीतून अचानक नोटा हवेत उडून जमिनीवर पडू लागल्या. बराच वेळ त्या गाडीतील लोकांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती. जोपर्यंत त्यांना ही गोष्ट कळली तोवर खूप सारे डॉलर हवेत उडाले होते. यावेळी रस्त्याने येजा करणाऱ्या लोकांनी आपापल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावत डॉलर घेण्यासाठी धाव घेतली.
येथील डाउनवुड पोलिसांच्या मते, वाहनचालक आणि संबंधित लोकांच्या दुर्लक्षामुळे 175,000 म्हणजे जवळपास 1 कोटी 20 लाख हवेत उडाले. यापैकी जवळपास एक लाख डॉलर हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 75 हजार डॉलर घेऊन लोकांनी पोबारा केला आहे. पोलिसांकडून व्हिडीओ पाहून या ठिकाणी असलेल्या लोकांची ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे. अनेक लोकांनी स्वतः डॉलर पोलिसांकडे जमा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, या रस्त्यावर गाडीतून पैसे उडून जाण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. 2004 साली एका गाडीचा अपघात झाल्यानंतर 1 कोटी 36 लाख रुपये चोरी झाले होते तर 2018 मध्ये अशाच प्रकारे गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने जवळपास 4 कोटी 11 लाख रुपये गायब केले होते.