Azerbaijan Armenia War : एकीकडे रशिया (Russia) आणि युक्रेनच्या (Ukraine) युद्धाला सहा महिने उलटले आहेत, मात्र संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीय. तर दुसरीकडे आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्येही संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षात एका रात्रीत 100 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये सीमासंघर्ष पुन्हा एकदा सुरु झाला आहे. दोन्ही देशांमधील हा संघर्ष आता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या रिपोर्टनुसार, मंगळवारी रात्री दोन्ही देशांमधील एकूण 100 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक महिन्यांच्या शांततेनंतर अझरबैजान-आर्मेनिया यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आर्मेनियाच्या सुरक्षा परिषदेनं आपात्कालीन बैठक बोलावली आहे. या दोन्ही देशांतील परिस्थिती अशीच चिघळली तर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. आर्मेनियाच्या सुरक्षा मंत्रालयाने अझरबैजानने सीमावर्ती भागात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.
आर्मेनिया लष्करी कारवाई केल्याचा अझरबैजानचा आरोप
आर्मेनियाने लष्करी कारवाई केल्याचा आरोप अझरबैजाननं केला आहे. आर्मेनियाने 12 सप्टेंबरच्या रात्री उशिरा सीमेवरील दस्कासन, कलबाजार आणि लाचिन भागात मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई केल्याचा आरोप अझरबैजाननं केला आहे. आर्मेनियन सशस्त्र दलांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्या लष्करी चौक्या आणि पुरवठा लाइन रस्त्यांच्या दरम्यानच्या भागात स्फोटके पेरली. यामुळे अझरबैजानला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बचावात्मक उपाययोजना करण्यास प्रवृत्त केलं. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू झाला, असं अझरबैजाननं म्हटलं आहे.
रशियन सैनिक शांतीरक्षक म्हणून तैनात
मिळालेल्या अहवालानुसार, रशियाच्या मध्यस्थीने दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम झाला होता. मात्र तरीही दोन्ही देशांमधील संघर्ष सुरुच आहे. युद्धविराम करारानुसार सुमारे 2,000 रशियन सैनिक शांतता रक्षक म्हणून या भागात तैनात आहेत. रशियाने अझरबैजान आणि आर्मेनिया देशांना मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचं आवाहन केलं आहे. आर्मेनियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अझरबैजानच्या सैन्याने तोफखाना आणि ड्रोनने हल्ले केले. युद्धविरामासाठी रशियाच्या जलद मध्यस्थीचा प्रयत्न असूनही दिवसभर लढाई सुरूच असल्याचे मंत्रालयानं म्हटलं आहे.
आर्मेनियाने रशियाकडे मागितली मदत
आर्मेनियाने आपल्या सुरक्षा परिषदेत अझरबैजानने केलेल्या गोळीबाराचा अहवाल रशियाच्या नेतृत्वाखालील CSTO आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर बोलून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत मागितली आहे.