Desmond Tutu Died at 90: दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते आर्चबिशप डेसमंड टूटू यांचं रविवारी निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांना देशाचा Moral Compass असं म्हटलं जायचं.  टूटू यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी टूटू यांना आदरांजली अर्पण केली आहे. 
 
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, डेसमंड हे दक्षिण आफ्रिकेची शान होते. त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे. स्वतंत्र दक्षिण आफ्रिका बनवण्यात मुख्य पादरी डेसमंड टूट यांचं मोठं योगदान होतं, असं रामफोसा यांनी म्हटलं आहे. डेसमंड टूटू हे प्रखर देशभक्त, सिद्धांतांनुसार चालणारे तसंच व्यावहारिक नेते होते. त्यांनी बायबलमधील संदेश अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. कामाशिवाय धर्माला कोणताच अर्थ राहत नाही, असं ते म्हणत असत, असं रामफोसा यांनी सांगितलं.


पंतप्रधान मोदी , राहुल गांधींकडून श्रद्धांजली


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, आर्चबिशप अॅमेरिटस डेसमंड टूटू जागतिक स्तरावर अनेक लोकांसाठी मार्गदर्शक होते. मानवी समानतेवर त्यांचं मोठं कार्य होतं. मी त्यांच्या निधनानं खूप दु:खी झालो आहे. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती प्रदान करो, असं मोदींनी म्हटलं आहे.  






काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील डेसमंड टूटू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आर्चबिशप डेसमंड टूटू  वर्णभेदाविरोधातील लढाईचे प्रणेते होते. ते गांधीवादी होते. सामाजिक न्यायासाठी काम करणारे टूटू यांच्यासारखे महान नायक जगासाठी प्रेरणा देण्याचं काम करतील.





 कोण होते डेसमंड टूटू 
संपूर्ण जगभरात वर्णभेदाविरोधातील लढाईचं प्रतिक राहिलेल्या नेल्सन मंडेला यांचे डेसमंड टूटू हे समकालीन होते. वर्णभेद आधारित भेदभाव तसंच फुटीरवादी धोरण नष्ट करण्याच्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता.  वर्णभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1970 च्या दशकात एका युवा पादरीच्या भूमिकेसोबतच ते दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारच्या विरोधकांपैकी एक होते. 1986 मध्ये डेसमंड टूटू यांनी केपटाऊनच्या आर्चबिशप पदाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या तब्बल दहा वर्षांनी त्यांनी ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचं अध्यक्षपदही भूषवलं.