Anura kumara dissanayake: नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत श्रीलंकेच्या (srilanka) आर्थिक स्थितीवरुन जगभरात श्रीलंकेतील वास्तव समोर आलं होत. त्यामुळेच, देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्प्यावर श्रीलंकेत  (Sri Lanka presidential elections) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर (Election) डाव्या विचारसरणीचे सरकार तिथे विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) या मार्क्सवादी पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके (Anura Kumara Dissanayake) यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी (President) निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मुख्य विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा हे दोन्ही नेते राष्ट्रपतीपदाच्या ट्रेंडमध्ये मागेच होते. मात्र, अनुरा कुमार दिसनायके यांनी बाजी मारली, त्यांनी स्वत: ट्विटरवरुन विजयाची माहिती दिली. त्यामुळे, श्रीलंकेत पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीचा नेता राष्ट्रपती पदावर विराजमान होत आहे. दिसानायके यांनी राष्ट्रीय एकात्मकतेचा संदेश देत "सिंहली, तमिळ, मुस्लिम आणि सर्वच श्रीलंकन लोकांची एकता नव्या सुरुवातीचा आधार असल्याचे म्हटलं आहे. दिसानायके यांच्या रुपाने एका कामगाराचा मुलगा श्रीलंकेच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राष्ट्रपतीपदावर विराजमान झाला आहे.  


श्रीलंकेतील निवडणूक निकालांनुसार, अनुरा कुमारा दिसानायके यांना 42.31 टक्के मते मिळाली आहेत. श्रीलंकेत उमेदवाराला विजयी होण्यासाठी 51 टक्के मतांची आवश्यकता असते. निवडणूक निकालांमध्ये विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांना सुमारे 32 टक्के  मते मिळाली असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे, जे दुसऱ्या टर्मसाठी निवडणूक लढवत आहेत, त्यांना आतापर्यंत 16 टक्के मते मिळाली आहेत, तर पदच्युत राष्ट्रपतींचे पुतणे नमल राजपक्षे यांना अवघी 3 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे, 55 वर्षीय अनुरा कुमार दिसानायके यांच्या रुपाने एका कामगाराचा मुलगा श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाला आहे. 


कामगाराचा मुलगा ते राष्ट्रपती


जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) पक्षाचे नेते असलेल्या अनुरा कुमार दिसानायके यांचा जन्म श्रीलंकेची राजधानी कोलोंबोपासून दूर असलेल्या थंबुट्टेगामा गावातील एका कामगार कुटुंबात झाला. आपल्या गावातून विद्यापीठात शिक्षण घेणारे दिसानायके हे पहिले विद्यार्थी होते. सन 1980 मध्ये विद्यार्थी चळवळीतून ते राजकारणात आले. 1987 ते 1989 या कालावधीत सरकारविरुद्ध आंदोलन करत त्यांनी जेव्हीपी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर, आंदोलने व सरकारविरुद्ध आवाज उठवून आपली लढाऊ प्रतिमा जनमाणसांत व पक्षातही निर्माण केली. श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती दिसानायके यांनी आपल्या राजकीय जीवनात आणि आयुष्यातही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सन 1995 मध्ये सोशलिस्ट स्टूडेंट्स एसोसिएशनचे राष्ट्रीय आयोजक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीची देशपातळीवर सुरुवात केली. त्यानंतर, जेवीपीच्या केंद्रीय कार्य समितीमध्ये त्यांना स्थान मिळाले. सन 2000 मध्ये दिसानायके पहिल्यांदाच खासदार बनून श्रीलंकेच्या संसदेत पोहोचले. त्यावेळी, तीन वर्षे ते पक्षाचे राजकीय ब्युरो सदस्य होते. सन 2004 मध्ये श्रीलंका फ्रीडम पार्टी (एसएलएफपी) सोबत आघाडीत सत्तेत आल्यानंतर त्यांना कृषी आणि जलसिंचन मंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र, 1 वर्षातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सातत्याने मार्क्सवादी विचारधारेला त्यांनी प्रोत्साहन दिले, तोच विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. विद्यार्थी आणि कामगार हे दोन मुद्दे प्रामुख्याने त्यांच्या अजेंड्यावर आणि भाषणातही दिसून येतात.श्रीलंकेतील शिक्षण, आरोग्य आणि परिवहन यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 






राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 75 टक्के मतदान


श्रीलंकेत, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत उमेदवाराला 51 टक्के मते मिळाली नाहीत, तर राष्ट्रपती पदासाठी मतदारांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडीच्या आधारे दुसऱ्या फेरीतील मतांची मोजणी केली जाईल. 2022 च्या उठावानंतर श्रीलंकेच्या पहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शनिवारी जवळपास 75 टक्के मतदान झाले. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत 83 टक्के मतदान झाले होते. मतदान आणि मतमोजणी सुरू झाल्यानंतर लगेचच देशभर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.


हेही वाचा


सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे