नाशिक : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ मानलं जाणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर (Saptashrungi) दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगगड देवी भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून चार दिवस सप्तशृंगी घाट भाविकांसाठी बंद राहणार आहे. 23 ते 26 सप्टेंबरपर्यंत 4 दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद रहाणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी घाटात दरड प्रतिबंधक जाळी बसविण्याचे काम पर्यटन तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्यात येत असून हे काम सध्या सुरू असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिली आहे. त्यामुळे, सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या किंवा या गडाकडे घाटातून जाणाऱ्या भाविकांनी याची नोंद घेऊन आपला प्रवासाचा मार्ग बदलला पाहिजे. 


गणेशोत्सवानंतर भाविकांना उत्सुकता असते ती नवरात्री उत्सवाची. महाराष्ट्रासह देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवींची मनोभावे पूज व आरती करुन 9 दिवस जागरण करण्यात येते. त्यामुळे, नवरात्र व कोजागिरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर हे काम सुरू करण्यात आलं आहे. घाटातील सैल दगडही काढले जाणार आहेत, अनेकदा दरड कोसळून वाहतुकीची कोंडी होत असल्याने हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी या कालावधीमध्ये गडावर येण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


नवरात्रीसाठी सप्तश्रृंगी गडावर भाविकांची गर्दी


श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासून 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे.देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे. यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी 'अर्ध शक्तीपीठ' मानले जाते. देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे. या ठिकाणी माता भगवती निवास करते. 'सप्तश्रृंग' ह्या शब्दाचा अर्थ 'सातशिखरे' असा आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत. गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला 'मार्कंडेय डोंगर' आहे. हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते. येथे त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली. या मंदिरस्थळी चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. आता लवकरच नवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी सप्तश्रृंगी गडावर पाहायला मिळते. 


हेही वाचा


महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष