बीजिंग : भल्या-भल्या इमारती, विस्तारलेल्या अपार्टमेन्ट्स, मोठाले रस्ते, सर्व सुविधा ... या सगळ्या गोष्टी असूनही या ठिकाणी नागरिक राहत नाहीत. या शहरांतील सगळ्या इमारती मोकळ्या पडल्यात, सगळे रस्ते निर्मनुष्य आहेत. ही अवस्था आहे चीनच्या 'घोस्ट सिटीं'ची. पण आता ही शहरं पुन्हा गजबजण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी नागरिक परत येत असल्याचं चित्र दिसत असून येत्या काही वर्षात या शहरांना पुन्हा एकदा 'अच्छे दिन' येतील अशी आशा चीनमध्ये व्यक्त केली जात आहे. 


एकेकाळी चीनच्या सरकारने विकासाला चालना देण्यासाठी ही महत्वाकांक्षी शहरं उभारली होती. पण नागरिकांनी आणि उद्योगांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि ती एखाद्या भूत बंगल्यासारखी पडीक पडली. चीनमधील या घोस्ट सिटीज् म्हणजे एकेकाळी पाश्चात्यांसाठी मोठं आकर्षण. पण आता भल्यामोठ्या इमारती असून सुद्धा संपूर्ण शहरं ही निर्मनुष्य दिसतात. 


एकेकाळी नागरिकांनी आणि उद्योगांनी गजबजलेली शहरं ही आता पूर्णत: निर्मनुष्य आहेत. तिथल्या रस्त्यांना विरान स्वरुप आलं आहे. चीनच्या सरकारने या ठिकाणी भलीमोठी गुंतवणूक करुन ठेवली आहे. 


सन 1978 साली चीनची केवळ 18 टक्के लोकसंख्या ही शहरात राहत होती. आज त्याची संख्या ही 64 टक्क्यांवर पोहोचली आहे. चीनमध्ये एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेली किमान दहा मेगासिटीज् आहेत. जगातल्या शहरांत राहणाऱ्या एक दशांशहून अधिक लोकसंख्या ही चीनच्या शहरांत राहते. 


घरांच्या वाढत्या किंमतींचा परिणाम शहरांवर
चीनमधील न्यू ओर्डोस या शहराला मॉडर्न घोस्ट सिटी म्हणून ओळखलं जायचं. 10 लाख लोकसंख्येसाठी तयार करण्यात आलेल्या या शहरात एकेकाळी दोन टक्केही लोकसंख्या राहत नव्हती. या शहरातील सर्व उद्योगं ही इतर शहरांत गेली. या शहरातील घरांच्या किंमती एवढ्या मोठ्या ठेवण्यात आल्या होत्या की सामान्यांना ही घरं घेणं खूप अवघड झालं होतं. पण आता या शहरात पुन्हा एकदा नागरिक परत येताना दिसत आहेत. हीच अवस्था बिनाई न्यू एरिया, तियानजिन, झेंगझाऊ, खांगबाशी या शहराची आहे.


या घोस्ट सिटींमध्ये आता नागरिकांना आणि उद्योगांना परत आणण्यासाठी चीनच्या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.


 






संबंधित बातम्या :