न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींनी भारतात केलेल्या कामाचं कौतुक केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना त्यांचा फादर ऑफ इंडिया असा उल्लेख केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्तिमत्व आहेत. भारतातील परिस्थिती याआधी अशी नव्हती. मोदींनी विखुरलेल्या भारताला एकत्र आणलं. त्यामुळे ते भारताच्या राष्ट्रपित्यासारखेच आहेत. आपण त्यांना भारताचे फादर ऑफ इंडिया म्हणूया, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.


नरेंद्र मोदींच कौतुक करताना ट्रम्प यांनी त्यांची तुलना प्रसिद्ध गायक, अभिनेते एल्विस प्रेस्लीशी केली. ट्रम्प यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेस्ली यांच्याप्रमाणे लोकप्रिय आहेत. असं वाटतंय की एल्विस प्रेस्ली पुन्हा आले आहेत.





न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील आयएसआय आणि अल कायदा याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलतांना ट्रम्प यांनी म्हटलं की, दहशतवादाविरोधातील मोहिमेत अमेरिका भारतासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एकामेकांची चर्चा करून जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर तोडगा काढू शकतात.





संबंधित बातम्या