न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका दाम्पत्याने आपल्या आयुष्यातील साठ वर्षांहून अधिक काळ एकमेकांना सोबत दिली. सुमारे 63 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकेलेल हेन्री आणि जीनेट जी लेंग यांनी रविवारी अमेरिकेतील साऊथ डकोटातील एका हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे 60 हून अधिक वर्षे सोबत निभावलेल्या या दोघांचा मृत्यूही 10 मिनिटांच्या अंतराने झाला.
या दाम्पत्याला पाच मुलं असून, त्यातील एक जणाने आई-वडिलांच्या मृत्यूबाबत सीएनएनशी संबंधित ‘केएसएफवाय’शी बोलताना सांगितले, “याला आम्ही दैवी चमत्कार मानतो.”
दाम्पत्यामधील अल्झायमर पीडित 87 वर्षीय जीनेट या 2011 सालापासून हॉस्पिटलमध्ये होत्या, तर 86 वर्षीय पती हेन्री रोज जीनेट यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असत. प्रोस्टेट कॅन्सर आणि आरोग्य ढासळल्यानंतर हेन्ररीही हॉस्पिटलमध्ये आपल्या पत्नीच्याच रुममध्ये भरती झाले होते.
जीनेट-हेन्री यांच्या कुटुंबीयांनी सांगितले, “31 जुलैला सकाळी 5.10 वाजल्यापासून दोघांचीही स्थिती गंभीर होती. त्यानंतर जीनेट यांचं निधन झालं आणि त्यानंतर 20 मिनिटांनी हेन्री यांचाही मृत्यू झाला.”