Al-Zawahiri Killed: अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी (Al-Qaeda Ayman al-Zawahiri) काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. एकीकडे या कारवाईनंतर दहशतवादाविरोधात अमेरिकेला मोठे यश मिळाले आहे. मात्र सूत्रांकडून अशी माहिती समोर येत आहे की, हे ऑपरेशन होण्यापूर्वीच भारताकडे या हल्ल्याची माहिती होती. मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलैपासून या हल्ल्याबाबत भारताला माहित होता, मात्र भारत अमेरिकेकडून औपचारिक घोषणेची वाट पाहत होता.
आता खरा न्याय झाला - जो बायडेन
1 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दावा केला होता की, अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी रविवारी सकाळी 6.18 वाजता अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, आता खरा न्याय झाला आहे आणि हा दहशतवादी आता जिवंत राहिलेला नाही.
तालिबानकडून या कारवाईचा निषेध
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत अमेरिकेच्या कारवाईवर टीका केली.
काय म्हणाले बराक ओबामा?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इंटेलिजन्स कम्युनिटीच्या सदस्यांना शाबासकी दिली आहे. वर्षानुवर्षे या संधीची वाट पाहणाऱ्या अध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व सदस्यांचे कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी अल-जवाहिरीच्या मृत्यूची बातमी ही दहशतवादाचा नायनाट करणे शक्य असल्याचा पुरावा आहे आणि मला आशा आहे की ही बातमी 9/11 च्या कुटुंबांसाठी आणि अल-कायदाच्या सर्व म्होरक्यांसाठी एक इशारा असेल.
अल-आदेल अल कायदाचा नव्या म्होरक्या
कुख्यात दहशतवादी अल-आदेल याची अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात आली आहे. अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर लगेचच संघटनेनं नवीन प्रमुख निवडला आहे. लादेननंतरचा अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठं यश आहे.