Al-Qaeda Leader Killed In US Drone Strike: अमेरिकेने (US) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, आता खरा न्याय मिळाला..
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. बीबीसीच्या वृत्तानुसार बायडेन म्हणाले की, "आता खरा न्याय मिळाला आहे आणि हा दहशतवादी मास्टरमाईंड आता जिवंत राहिलेला नाही," 


जवाहिरी आणि लादेन अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याचे सूत्रधार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे डागली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. ते म्हणाले की, कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी उपस्थित होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही आणि फक्त जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता.


तालिबानने काय म्हटले?
तालिबानच्या प्रवक्त्याने अमेरिकेच्या या कारवाईला आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन म्हटले आहे. "अशा कारवाया म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या अयशस्वी अनुभवांची पुनरावृत्ती आहे आणि ती युनायटेड स्टेट्स, अफगाणिस्तान आणि क्षेत्राच्या हिताच्या विरोधात आहे," असे सांगितले.


अमेरिकेच्या हल्ल्यामागे जवाहिरीचा हात
इजिप्तच्या इस्लामिक जिहाद दहशतवादी गटाची स्थापना करण्यात मदत करणारे नेत्रचिकित्सक (Eye Surgeon) जवाहिरीने मे 2011 मध्ये लादेनला अमेरिकन सैन्याने मारल्यानंतर अल-कायदाचे नेतृत्व हाती घेतले. याआधी, जवाहिरीला अनेकदा बिन लादेनचा उजवा हात आणि अल-कायदाचा मुख्य विचारवंत म्हटले जायचे. 11 सप्टेंबर 2001 रोजी युनायटेड स्टेट्समध्ये झालेल्या हल्ल्यामागे त्याचा "ऑपरेशनल मेंदू" होता असे काही तज्ञांचे मत आहे.


लादेनचा राईट हॅंड
1980 च्या दशकात तुरुंगात असलेल्या जवाहिरीने त्याच्या सुटकेनंतर देश सोडला आणि हिंसक आंतरराष्ट्रीय जिहादी चळवळींमध्ये सामील झाला. अखेर तो अफगाणिस्तानात स्थायिक झाला, यावेळी तो ओसामा बिन लादेनबरोबर दहशतवादी संघटनेत सामील झाला. त्यांनी एकत्रितपणे अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले आणि 11 सप्टेंबर 2001 रोजी हल्ले केले.