S Jaishankar on Pakistan : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला उत्तर देताना म्हटलं आहे की, 'सापाला दूध पाजाल तर त्याचा उपद्रव तुम्हालाही होईल.' पाकिस्तानच्या एका प्रश्नाला उत्तर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांच्यावर ताशेरे ओढले. हिना रब्बानी खार यांनी आधी भारतावर दहशतवाद पसरवल्याचा आरोप केला. इतकच नाही तर रब्बानी यांनी भारत अतिरेक्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही केला.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी यांच्या आरोपाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी हिलरी क्लिंटन यांच्या दशकापूर्वीच्या वक्तव्याची आठवण करून दिली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटलं की, तुम्ही साप पाळला तर तो फक्त शेजारीच नाही तर तुमच्या घरातील लोकांनाही चावेल. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानला अनेक देशांकडून वारंवार सल्ले मिळतात पण पाकिस्तान मानायला तयार नाही. भारताविरुद्ध विष फेकण्यासाठी पाकिस्तानने एक डॉजियर (गुन्ह्यांची फाईल) तयार केला आहे, ज्याचा वापर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचांवर करतो. भारताने UN परिषदेत दुसऱ्यांदा पाकिस्तानला खडसावलं.
भारतानं चीन आणि पाकिस्तानला सुनावलं
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) सांगितले की, जग न्यूयॉर्क सारखा दुसरा 9/11 किंवा मुंबईसारखा दुसरा 26/11 हल्ला होऊ देऊ शकत नाही. पाकिस्तानचे नाव न घेता परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं की, दहशतवादाची काही केंद्रे अजूनही सक्रिय आहेत. पुरावे असूनही दहशतवाद्यांवर बंदी घालण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल त्यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावलं. पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांवर संयुक्त राष्ट्राने बंदी घालण्यात चीनने नेहमीच अडथळे आणले आहेत.
'दहशतवाद कुठून सुरू होतो हे जगाला माहित आहे'
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, 'मला माहित आहे की, आपण अडीच वर्षांपासून कोरोनाशी लढा देत आहोत आणि त्यामुळे आठवणी काहीशा धुसर झाल्या आहेत. असं असलं तरीही मी तुम्हाला खात्री देतो की, दहशतवादाची सुरुवात कुठून होते आणि त्यावर कोणाचा प्रभाव आहे हे जग विसरलेले नाही. म्हणून मी म्हणेन की, कोणत्याही कल्पनेत जगण्यापूर्वी त्यांनी स्वतःची जाणीव करून दिली पाहिजे.' UNमध्ये पाकिस्तानने भारतावर आरोप केला होता की, 'भारत दहशतवादाला चालना देत आहे. दहशतवादाचा भारतापेक्षा कोणत्याही देशाने चांगला वापर केला नाही.'