या एअरक्राफ्टची लांबी 92 मीटर, रुंदी 44 मीटर आणि उंची 26 मीटर आहे. विमानाच्या निर्मितीसाठी 25 दशलक्ष पाऊण्ड म्हणजेच जवळपास 2.5 अब्ज रुपये इतका खर्च आला आहे. हे एअरक्राफ्ट बनवण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. हेलिअम गॅसवर उडणाऱ्या या विमानाचा काही भाग विमानाचा, काही भाग जहाजाचा तर काही भाग हेलिकॉप्टरचा आहे.

हे विमान तीन आठवड्यांपर्यंत आकाशात प्रवास करु शकतं. क्रूसोबत 48 प्रवाशांना हे विमान घेऊन जाऊ शकतं. तसंच 10 हजार टन सामानही उचलू शकतं. कोणत्याही प्रवासी जेटपेक्षा याची लांबी 15 मीटर जास्त असते.
ताशी 148 किमी वेगाने उडणारं एअरलँडर हे एक हेलिकॉप्टरच आहे. कारण याला उडण्यासाठी किंवा उतरण्यासाठी रनवेची गरज लागत नाही. या एअरक्राफ्टला पाण्यावरही उतरता येतं तसंच रिमोटनेही ते नियंत्रित करता येऊ शकतं.
ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याचं डिझाईन बनवलं असून हे विमान ध्वनी आणि वायू प्रदूषण करत नसल्याचा दावाही केला आहे.
या विमानाची कल्पना सर्वप्रथम अमेरिकन सैन्याने 2009 साली मांडली होती. अमेरिकेला अफगाणिस्तानात माल वाहतूक करण्यासाठी याचा वापर करण्याची इच्छा होती. मात्र संरक्षण निधीतील तुटीमुळे 2012 साली त्यांना हा प्रकल्प बंद करावा लागला. त्यानंतर ही कल्पना ब्रिटीश कंपनीने उचलून धरत विमानाची निर्मिती केली.