काबुल : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेला खलिल हक्कानी आता काबुलच्या रस्त्यावर खुलेआम फिरताना दिसत आहे. या हक्कानीला पकडून देणाऱ्यास अमेरिकेने 5 मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल 37 कोटी 15 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. आज सकाळी हक्कानीने काबुलच्या पुल-ए-खिश्ती या मस्जिदमध्ये लोकांना तालिबानशी निष्ठा राखण्याची शपथ दिली. अफगाणिस्तानची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता असल्याचं हक्कानीने यावेळी सांगितलं. 


अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सने यासंबंधी एक वृत्त प्रकाशित केलं आहे. आता अफगाणिस्तानच्या व्यापार आणि शिक्षणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही हक्कानीने सांगितलं आहे. तसेच यापुढे महिला आणि पुरुष असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही असंही त्याने स्पष्ट केल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या वृत्तात छापलं आहे.  


खलिल हक्कानीने मस्जिदमध्ये भाषण केलं आणि त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी तालिबान आणि हक्कानीच्या समर्थनार्थ घोषणा द्यायला सुरुवात केली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा विस्तार करण्यात हक्कानी नेटवर्कचं मोठं योगदान आहे.


जलालुद्दीन हक्कानी यांने 1970 साली हक्कानी नेटवर्कची स्थापना केली आहे. या हक्कानी नेटवर्कचा विस्तार अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये झाला असून या प्रदेशात या दहशतवादी गटाच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर चालतात. अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड ओसामा बीन लादेन याला 2001 मध्ये अमेरिकेच्या तावडीतून पळून जाण्यात हक्कानी नेटवर्कने मदत केली होती. त्यामुळे या हक्कानी नेटवर्कवर अमेरिकेने बंदी घालती असून याचा प्रमुख खलिल हक्कानीवर 37 कोटी 15 लाखांचे बक्षीस ठेवलं आहे. 


अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर काही दिवसांतच तालिबान्यांनी देश ताब्यात घेतला असून ते आता अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यापुढे अफगाणिस्तान शरियाच्या कायद्यावर चालणार असल्याचं तालिबानने स्पष्ट केलं आहे. तालिबानी दहशतवाही सध्या काबुलच्या रस्त्यावर खुलेआम शस्त्रास्त्रांसह फिरताना दिसत आहेत. या आधीच्या सरकारला आणि अमेरिकेला ज्या लोकांनी मदत केली, माहिती पुरवली आहे त्यांना शोधून ठार मारण्याचं काम तालिबानी दहशतवादी करताना दिसून येत आहे.


संबंधित बातम्या :