Afghanistan Crisis : अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपलं सैन्य पूर्णपणे मागे घेतलं आहे. यूएस जनरल केनेथ एफ मॅकेंजी यांनी यासंदर्भात घोषणा केली. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्याची आणि अमेरिकन नागरिकांसह अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सुरु केलेल्या लष्करी मोहिमेच्या शेवटाची घोषणा करतो. ते पुढे म्हणाले की, शेवटचं सी-17 विमान हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी रवाना करण्यात आलं. 


याव्यतिरिक्त अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपली राजकीय उपस्थितीही संपवली असून ती कतारमध्ये हलवण्यात आली आहे. न्यूज एजंसी एएफपीनं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्या हवाल्यानं ही माहिती दिली. ब्लिंकन म्हणाले की, अफगाणिस्तान सोडू इच्छित असलेल्या प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मदत करण्यास अमेरिका वचनबद्ध आहे.


अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या घोषणेसोबतच जनरल केनेथ एफ मॅकेंजी म्हणाले की, "सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अतिरिक्त अमेरिकन नागरिक आणि अफगाणी नागरिकांसाठी राजकीय मिशन सुरु आहे." दरम्यान, अमेरिकेनं आपल्या सैनिकांना अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघारी घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची अंतिम तारिख दिली होती. 


अफगाणिस्तानातील आमची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपुष्टात आली : जो बायडन


याबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन म्हणाले की, "आता अफगाणिस्तानातील आमची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपुष्टात आली आहे. अफगाणिस्तानातून धोकादायक निर्वासनासाठी मला आमच्या कमांडरांचे आभार मानायचे आहेत."


जो बायडन म्हणाले की, "यूएन सिक्योरिटी काऊन्सिलचा प्रस्ताव एक स्पष्ट संदेश पाठवत आहे की, तालिबानने विचार करावा, अशी आंतरराष्ट्रीय समुदायाची अपेक्षा आहे, विशेषतः प्रवास स्वातंत्र्याच्या संदर्भात. तालिबानने सुरक्षित मार्गासाठी वचन दिले आहे आणि त्यांनी त्यांच्या वचनबद्धतेचे पालन करावं. जे नागरिक अफगाणिस्तान सोडू इच्छितात, त्यांच्यासाठी सतत प्रस्थान करण्यासाठी विमानतळ पुन्हा उघडण्यासाठी भागीदारांसह समन्वय असेल."


राष्ट्रपती जो बायडन म्हणाले की, "मी परराष्ट्र मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत की, ते आंतरराष्ट्रीय भागीदारांशी सतत समन्वय साधतील, जेणेकरुन कोणत्याही अमेरिकन, अफगाण नागरिक आणि परदेशी नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग सुनिश्चित करणं शक्य होईल, जे अफगाणिस्तान सोडू इच्छितात. यामध्ये आज पारित यूएनएससी प्रस्तावाचाही समावेश असेल"


दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) ने सोमवारी, भारताच्या वर्तमान अध्यक्षतेखाली, अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर एक ठराव मंजूर केला आहे. ज्यामध्ये युद्ध प्रभावित देशाचा वापर कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी किंवा दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी केला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


तालिबानी म्हणतात, भारत आमचा शत्रू नाही; भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचेत