न्यूयॉर्क : कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं आहे, असं मत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य (White House) आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची (Dr. Anthony Fauchi) यांनी व्यक्त केलं आहे. दोन डोस घेतल्यानंतरही काही महिन्यानंतर लसीची कार्यक्षमता लसीचा प्रभाव कमी होऊन कोविड संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, तिसरा 'बुस्टर' (Booster Dose) डोस घेतला तर कोविड संसर्गाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो, अशी आकडेवारीच त्यांनी सादर केली. इस्रायलमध्ये तिसरा डोस दिल्यानंतर कशा पद्धतीने संरक्षण मिळतं याचे दाखलेही त्यांनी दिले. त्यामुळे कोविड लसीचे दोन नव्हे तर तीन डोस घेणं हे नित्याचंच होईल कारण तशीच गरज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत येत्या काही दिवसात (20 सप्टेंबरपासून) नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी सुरु आहे. त्याबाबतचं नियोजन पूर्ण झालं आहे. फायझर आणि मॉडर्ना लसीचा तिसरा डोस पूर्ण झाल्यानंतर आठ महिन्यांनी तिसरा डोस दिला जाणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय तेथील एफडीए लवकरच घेणार आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत जवळपास चार कोटी लोकांना कोरोनाबाधित झाले आहेत तर जवळपास साडेसहा लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने आणि त्यातच मुलांमध्ये संसर्ग वाढू लागल्याने काहीसं चिंतेच वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत 36 कोटी 73 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यातील 17 कोटींपेक्षा जास्त लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
गेल्या 24 तासात 42 हजार 618 नवीन रुग्णांची भर
गेल्या काही दिवसापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाच्या 42 हजार 618 नवीन रुग्णांची भर पडली असून 330 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 36 हजार 385 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी 45,352 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 366 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
देशातील चार लाख पाच हजार 681 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 67 कोटी 72 लाख 11 हजार 205 डोस देण्यात आले आहेत. केरळमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असून काल एकाच दिवसात त्या ठिकाणी 29 हजार 322 रुग्णांची भर पडली आहे तर 131 जणांचा मृत्यू झाला.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती :
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 29 लाख 45 हजार 907
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 21 लाख 001
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : चार लाख पाच हजार 681
एकूण मृत्यू : चार लाख 40 हजार 225
एकूण लसीकरण : 67 कोटी 72 लाख 11 हजार 205 डोस