Aditya L-1: चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) ऐतिहासिक यशानंतर इस्रो पुन्हा एका नवीन मिशनसाठी सज्ज झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सूर्यावरील संशोधनासाठी आज आदित्य एल-1 (Aditya-L1) मोहीम प्रक्षेपित करणार आहे. इस्रोने (ISRO) सूर्यावरील संशोधनासाठी आपलं मिशन सुरु करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. जगातील इतर देशांकडून याआधी 20 हून अधिक मोहिमा सूर्यावर पाठवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये अनेक देशांना यशही मिळालं आहे. भारतापूर्वी अमेरिकेनेही सूर्याकडे आपलं अंतराळयान पाठवलं आहे.


एकट्या नासाने सूर्यावर पाठवल्या 14 मोहिमा


विविध देशांकडून आतापर्यंत 22 मोहिमा सूर्यावर पाठवण्यात आल्या आहेत, पण सूर्य मोहीम पूर्ण करणाऱ्यांमध्ये मात्र फक्त अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सीचा समावेश आहे. नासाने सूर्यावर सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीने 1994 मध्ये पहिली सूर्य मोहीम पाठवली, ज्यामध्ये त्यांना नासाने मदत केली होती. नासाने आतापर्यंत सूर्यावर 14 मोहिमा पाठवल्या आहेत. सूर्यावरील संशोधनात नासाचं 'पार्कर सोलर प्रोब' आघाडीवर आहे आणि त्याने 26 वेळा सूर्याभोवती प्रदक्षिणा घातली आहे. नासाने 2001 मध्ये जेनेसिस मिशन देखील सुरु केलं, या अभियानांतर्गत सौर वाऱ्यांचे नमुने घेण्यात येणार होते.


कोणत्या आहेत नासाच्या सूर्य मोहिमा?


नासाने अनेक सूर्य मोहिमा पाठवल्या आहेत. यामध्ये SOHO (सोलर आणि हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी), पार्कर सोलर प्रोब आणि आयरिस (इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ), हिनोड, सोलर डायनॅमिक्स ऑब्जर्वेटरी इत्यादींचा समावेश आहे. नासाची पार्कर सोलर प्रोब मोहीम सूर्यावरील संशोधनात आघाडीवर आहे. सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचणारं हे एकमेव अंतराळयान आहे.


नासाने 2018 मध्ये 'पार्कर सोलर प्रोब' अवकाशात पाठवलं. त्याच्या प्रक्षेपणानंतर अनेक वर्षांनी नासाने सांगितलं की, पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या वरच्या वातावरणातून गेलं होतं. मोहिमेदरम्यान, पार्कर सोलर प्रोबने तिथे उपस्थित असलेल्या चार्ज केलेल्या कणांचे नमुने घेतले. यासोबतच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची माहितीही गोळा करण्यात आली. पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या पृष्ठभागापासून 65 लाख किलोमीटरच्या त्रिज्येत तिथे उपस्थित असलेल्या उर्जेचा प्रवाह आणि सौर वारा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.


भारतासाठी आदित्य L1 मोहीम का महत्त्वाची?


आदित्य L1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम असणार आहे. आदित्य L1 मोहीम भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही पहिली भारतीय मोहीम आहे आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना आपला सर्वात जवळचा तारा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. आदित्य यान L1 बिंदूजवळील कक्षेत अविरत परिभ्रमण करत राहणार आहे, त्यामुळे सूर्याचं निरीक्षण कोणत्याही अडथळ्याविना आणि कोणतंही ग्रहण न होता करता येईल. त्यामुळे सूर्यावरील घडामोडी विनाखंड पाहणं शक्य होणार आहे. या यानावर सात उपकरणं असतील, त्यांच्याद्वारे सूर्याचे फोटोस्फीअर, क्रोमोस्फीअर, सौर किरीट यांचा अभ्यास करणं शक्य होणार आहे.


हेही वाचा:


Aditya L1: चांद्रयान 3 च्या यशानंतर 'आदित्य L1'चे वेध; काय आहेत सूर्य मोहिमेची उद्दिष्टं?