Chandrayaan 3: चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) यशानंतर संपूर्ण देशाला सुखद धक्का बसला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ही अवघड कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आणि जगभरातून भारताचं कौतुक झालं. आता या क्षणानंतर अनेकांनी चंद्रावर जमीन खरेदी (Resgister land on moon) करण्यास सुरुवात केली आहे. भारताने चंद्रावर चांद्रयान 3 उतरवल्यापासून भारतीय लोकांमध्ये चंद्राविषयीची क्रेझ वाढली आहे. यासोबतच चंद्रावर ज्या प्रकारे नवनवीन शोध लावले जात आहेत, त्यामुळे भविष्यात सर्व काही सुरळीत राहिल्यास चंद्रावरही मानवी वसाहती वसू शकतात. मात्र, चांद्रयानच्या लँडिंगच्या आधीपासून चंद्रावरील जमिनीची विक्री सुरु आहे. तर चंद्रावर जमीन नेमकी कशी खरेदी केली जाते आणि नुकतीच कोणी कोणी ती खरेदी केली? हे जाणून घेऊया.


जम्मू-काश्मीरमधील उद्योजकाने केली चंद्रावर जमीन खरेदी


जम्मू आणि काश्मीरमधील उद्योजक रुपेश मैसन यांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे, त्यांनी ज्या भागात जमीन खरेदी केली त्या परिसराला 'फाऊंटन ऑफ हॅपिनेस' (Fountain of Happiness) असं म्हणतात. 49 वर्षीय मैसन हे जम्मू आणि काश्मीरच्या लेह येथील यूसीएमएएसचे विभागीय संचालक आहेत. त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती दिली आहे. 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या नावावर रजिस्ट्री झाली आहे. 


राजस्थानच्या तरुणाकडून रक्षाबंधननिमित्त बहिणीला चंद्रावरील जमीन भेट


राजस्थानमधील करौली येथे राहणाऱ्या तरुण अग्रवाल याने आपल्या बहिणींच्या नावे चंद्रावर जमीन खरेदी केली आहे, रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून त्याने त्याच्या दोन्ही बहिणींना ही भेट दिली. आता आयुष्यभर चंद्राकडे पाहताना त्यांना आठवेल की त्यांचीही चंद्रावर जमीन आहे. चंद्रावरील जमिनीची ही अनोखी भेट करौलीत चर्चेचा विषय बनली आहे.


दीड महिन्याच्या प्रक्रियेनंतर तरुण अग्रवाल याला रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी नकाशासह जमिनीचा हा तुकडा मिळाला. चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी त्यासा सुमारे 150 डॉलरचा खर्च आला. 


कशी विकत घेता येते चंद्रावर जमीन?


चंद्रावरील जमीन विकण्याबाबत बोलायचं झालं तर सध्या जगात अशा दोन कंपन्या आहेत, ज्या चंद्रावर जमीन विकत आहेत. यातील पहिली म्हणजे लुना सोसायटी इंटरनॅशनल (Luna Society International) आणि दुसरी इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री (International Lunar Lands Registry). या दोन्ही कंपन्या चंद्रावरील जमिनी जगभरातील लोकांना विकत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतीय लोकही चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत.


चंद्रावरील जमिनीची किंमत किती?


लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लुनार लँड्स रजिस्ट्रीसारख्या कंपन्या चंद्रावरील जमिनीची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. येथे एका एकर जागेची किंमत US$ 37.50 आहे. म्हणजेच 3,075 रुपयांमध्ये तुम्हाला चंद्रावर एक एकर जमीन मिळेल.


कशी करता येईल चंद्रावरील जमीन खरेदी?


चंद्रावर कोणीही जमीन खरेदी करु शकतो. Luna Society International आणि International Lunar Lands Registry या कंपन्या चंद्रावरील जमिनीची ऑनलाईन विक्री करत आहेत. जर तुम्हाला चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल, तर त्यांच्या वेबसाईटवर जा, तिथे जाऊन तुमची नोंदणी करा आणि तुम्ही ठराविक रक्कम देऊन जमीन खरेदी करु शकता. भारतीय लोकही याच प्रक्रियेतून चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत.


उद्योजकांपासून अभिनेत्यांची आहे चंद्रावर जमीन


2002 मध्ये हैदराबादचे राजीव बागरी आणि 2006 मध्ये बंगळुरुच्या ललित मेहता यांनीही चंद्रावर प्लॉट खरेदी केला होता. यासोबतच बॉलिवूडचा किंग खान, म्हणजेच शाहरुख खानकडेही चंद्रावर जमीन आहे. तथापि, त्याने ही जमीन खरेदी केलेली नाही, शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला ही भेट दिली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनेही चंद्रावर जमीन खरेदी केली होती.


हेही वाचा:


ISRO: मिशन आर्यभट्ट ते आदित्य L1 व्हाया चांद्रयान; इस्रोचा 60 वर्षांचा अभूतपूर्व प्रवास