Aditya L1: ‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) पहिल्या सौर मोहिमेसाठी तयार आहे. इस्रोच्या सूर्य मोहिमेचं (Sun Mission) लाँचिंग 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून होणार आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर इस्रो आता मिशन आदित्य L1 (Aditya L-1) लाँच करणार आहे. तिरुपती जिल्ह्यातील श्रीहरिकोटा (Shriharikota) येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य L1 हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. चंद्र-सूर्यांना ज्ञानकवेत घेण्याच्या या मोहिमा भारताच्या शिरपेचात मानाचे नवे तुरे रोवणाऱ्या आहेत.
काय आहे मिशन आदित्य L1?
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘इस्रो’ने आखलेली ही पहिली अंतराळ मोहीम आहे. PSLV-C 57’ या प्रक्षेपकाद्वारे यानाचं सूर्याकडे उड्डाण होणार आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मिशन आदित्यविषयी माहिती दिली आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, "ही भारताची पहिलीच सूर्य मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान 2 सप्टेंबरला लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य L1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे." आदित्य L1 च्या उड्डाणाची रंगीत तालीम आणि यानातील अंतर्गत तपासणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती देखील इस्रोने दिली आहे.
आदित्य L1 मोहीम का महत्त्वाची?
आदित्य L1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम असणार आहे. आदित्य L1 मोहीम भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही पहिली भारतीय मोहीम आहे आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना आपला सर्वात जवळचा तारा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. आदित्य यान L1 बिंदूजवळील कक्षेत अविरत परिभ्रमण करत राहणार आहे, त्यामुळे सूर्याचं निरीक्षण कोणत्याही अडथळ्याविना आणि कोणतंही ग्रहण न होता करता येईल. त्यामुळे सूर्यावरील घडामोडी विनाखंड पाहणं शक्य होणार आहे. या यानावर सात उपकरणं असतील, त्यांच्याद्वारे सूर्याचे फोटोस्फीअर, क्रोमोस्फीअर, सौर किरीट यांचा अभ्यास करणं शक्य होणार आहे.
आदित्य L1 सौर मोहिमेची उद्दिष्टं काय?
- सूर्याचा तपशीलवार अभ्यास करणे.
- सूर्याची कोरोनल रचना आणि गतिशीलता अभ्यासणे.
- सौर किरीटाचं तापमान आणि सौर वायूंच्या गतीचा अभ्यास करणे.
- सुर्याच्या किरणांतील वस्तुमान उत्सर्जन, ज्वाला आणि पृथ्वीजवळील वातावरणाचा अभ्यास करणे.
- सौर वायूंचं वितरण आणि तापमानातील विषमता यांचा अभ्यास करणे.
- अंतराळ संशोधनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
- सोलर फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शनचं मूळ समजून घेणे.
हेही वाचा: