भारतीय वंशाच्या अभिमन्यू मिश्राने 12 वर्षांच्या लहान वयात इतिहास रचला आहे. अभिमन्यू मिश्रा बुद्धिबळ इतिहासातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर झाला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अभिमन्यू मिश्राने 19 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी बुद्धीबळ इतिहासाचा सर्वात तरुण ग्रँड मास्टर होण्याचा विक्रम सर्जी कर्जाकिनच्या नावावर होता.


2002 मध्ये सर्जी कर्जाकिनने सर्वात तरुण ग्रँड मास्टर होण्याचा विक्रम केला. त्यावेळी कर्जाकिनचे वय 12 वर्षे 7 महिने होते. पण अभिमन्यूने वयाच्या 12 वर्ष आणि चार महिन्यात ग्रँड मास्टर बनून कर्जाकिनचा 19 वर्षांचा रेकॉर्ड मोडला.


अभिमन्यू मिश्राने बुडापेस्ट येथे आयोजित ग्रँडमास्टर स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर लिओन मेनडोंकाला पराभूत करून हे स्थान मिळवले आहे. ग्रँड मास्टर झाल्यानंतर अभिमन्यूने सांगितले की प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांचा फायदा त्याला मिळाला. अभिमन्यू म्हणाला, "लढाई खूप कठीण होती. पण शेवटी, लिओनने चुका केल्या, ज्याचा मला फायदा झाला. माझ्या या यशामुळे मी अत्यंत खूष आहे.


आधीच केली होती तयारी
अभिमन्यू मिश्राचे वडील अमेरिकेतील न्यू जर्सी येथे सॉफ्टवेअर अभियंता आहेत. अभिमन्यूच्या वडिलांनीच आपल्या मुलाला ग्रँड मास्टर स्पर्धेसाठी युरोपला पाठविण्याचा निर्णय घेतला. अभिमन्यूचे वडील हेमंत म्हणाले, आम्ही याला एक मोठी संधी म्हणून पहात होतो. आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच युरोपला पोहोचलो होतो. अभिमन्यूने आपले स्वप्न साकार केले आहे. आम्ही अत्यंत आनंदी आहोत.


ग्रँड मास्टर होण्यासाठी 100 ELO पॉईंट्स आणि 3 जीएम निकष आवश्यक आहेत. अभिमन्यूने यासाठी आधीच तयारी केली होती. अभिमन्यूने एप्रिल आणि मे मध्ये दोन निकष साध्य केले. जूनमध्ये तिसर्‍या जीएम मानदंडाची पूर्तता झाल्यावर अभिमन्यूने सर्वात कमी वयातील ग्रँड मास्टर ही पदवी मिळविली.