Abdul Rehman Makki : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताच्या अत्यंत महत्त्वाच्य़ा मागणीला मंजूरी दिलीये. हाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. खरंतर गेल्याचवर्षी भारताने मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी चीनने नकाराधिकार वापरत त्यात खोडा घातला होता. पण यावेळी भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त मागणीसमोर चीनलाही नमतं घ्यावं लागलं आणि लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झालाय.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. UNSC ने ISIL (दाएश) अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादी हाफीज सईदचा मेहुणा आहे. जगभरातल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या या क्रुरकर्म्याला आता युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.
अब्दुल रहमान मक्की सध्या दहशतवादासाठी निधी उभारण्यात व्यस्त होता. तरुणांना दहशतवादी बनवण्याच्या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. भारतात विशेषतः जम्मू आणि काश्मिरात तो हल्ल्यांची योजना आखत होता. युनायटेड नेशन्सने जाागतिक दहशतवादी घोषित केल्यामुळे
अब्दुल मक्कीवर काय कारवाई होणार?
मक्कीची जगभरातली मालमत्ता आणि संपत्ती गोठवली जाईल. या कारवाईमुळे मक्कीच्या प्रवासावर आता बंदी येणार आहे. मक्की यापुढे त्याच्या मालकीचे पैसे वापरु शकणार नाही. या कारवाईमुळे मक्कीला शस्त्रास्त्रांची खरेदीही करता येणार नाही. सोबतच अधिकार क्षेत्राबाहेर त्याच्या प्रवासावर गदा आली आहे.
अब्दुल मक्की कोण आहे ?
लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा आहे.
सईद नंतर लष्कर ए तोयबाचा नंबर दोनचा नेता म्हणून मक्कीची ओळख आहे.
अमेरिका आणि भारताने मक्कीला याआधीच आंतरराष्ट्रीय़ दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.
लष्कर ए तोयबाच्या विविध कारवायांसाठी निधी जमा करण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती.
युएस स्टेट डिपार्टमेंटच्या हवाल्यानुसार अब्दुल रहमान मक्कीला २०२० साली पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने दोषी ठरवलं होतं
दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता.
भारताने बऱ्याच काळापासून मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्याची मागणी युएनच्या सुरक्षा परिषदेत केली होती. पण दरवेळी या मागणीत चीनने खोडा घातलेला. याआधी दहशतवादी मसूद अजहरच्या कारवाईवेळीही चीनने अडथळे आणले होते. गेल्या वर्षी जून महिन्यात मक्कीवर कारवाईसाठी भारत आणि अमेरिकेनं संयुक्त निवेदन सादर केलं. यावेळी मात्र कारवाईवर चीनने कोणताही आक्षेप न घेतल्यानं मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि लष्कर ए तोयबाला आणखी एक झटका मिळाला.