No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या काही तास आधी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा माध्यमांना मुलाखत दिली आहे. पाकिस्तानच्या 'समा न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत पाक पंतप्रधान इम्रान खान म्हणाले आहेत की, ''उद्या धमाका होणार आहे. आम्ही आमच्या खासदारांना नॅशनल असेंब्लीच्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले असून त्यानंतरच काही बदल केले जाणार आहेत.'' 


'पूर्ण ताकदीने सभागृहात जाणार'


अविश्वास प्रस्तावावर उद्या मतदान होणार का, असा प्रश्न इम्रानला विचारण्यात आला, तेव्हा पाक पंतप्रधानांनी त्यावर कोणतेही थेट उत्तर दिले नाही. ते म्हणाले की, ''आम्ही पूर्ण ताकदीनिशी सभागृहात जाणार आहोत. उद्या देशातील जनता बघेल. जनतेचा आनंद पाहून जे शपथ घेण्याची तयारी करत आहेत, त्यांना धक्का बसणार आहे.'' ते म्हणाले, ''मी इतक्यात पराभव स्वीकारणार नाही. चांगला कर्णधार कधीही पराभवाचा विचार करत नाही. आमच्याकडे एक रणनीती आहे. उद्या ती बाहेर येईलच. मी माझ्या रणनीतीबद्दल फार कमी लोकांना सांगितले आहे.''


ते भारताला काही का बोलत नाहीत?


अमेरिकेच्या भारताबद्दलच्या धोरणावर बोलताना इम्रान खान म्हणाले आहेत की, ''भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. भारत हा अमेरिकेचा क्वाडमधला मित्र आहे. पण ते भारताला काही बोलत नाहीत. मग आम्हाला का बोलतात?" ते म्हणाले की, सध्या फक्त उद्याचे मतदान जिंकण्यावर भर आहे. त्यानंतर पुढे काय करायचं हे ठरू.


दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यामुळे त्यांच्या सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या अविश्वास प्रस्तावावर 3 एप्रिल रोजी मदन होणार आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये एकूण 342 सदस्य आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. एमक्यूएम या पक्षाने इम्रान खान यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विरोधी पक्षाकडे आता 177 सदस्य संख्या झाली असून इम्रान खान यांनी बहुमत गमावल्याची स्थिती आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: