50 years of Bangladesh : नवी दिल्ली : पाकिस्तानचे दोन भाग होऊन आजच्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 1971 रोजी स्वतंत्र बांग्लादेशची (Bangladesh ) निर्मिती झाली. भारतीय लष्कर आणि मुक्ती वाहिनीच्या कार्यकर्त्यांपुढे पाकिस्तानच्या सैनिकांनी बिनशर्थ शरनागती पत्करली होती. बांग्लादेशची जनता आजही हा ऐतिहासिक दिवस विसरली नाही. परंतु, बांग्लादेशच्या निर्मितीस कारणीभूत ठरले होते शेख मुजीबूर रहमान यांचे भाषण. 


ते वर्ष होतं 1971 चं. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. या तणावाच्या आधीच काही महिने बंगबंधू शेख मुजीबूर रहमान (Sheikh Mujibur Rahman ) यांच्या नेतृत्वाखालील पूर्व पाकिस्तानातील सर्वात मोठा असलेला राजकीय पक्ष अवामी लीगने सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला होता. परंतु पश्चिम पाकिस्तानातील राजकीय आणि लष्करी नेतृत्व बंगालींना सत्ता हस्तांतरित करण्यास सहमत नव्हती.  


नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन 3 मार्च 1971 पासून सुरू होणार होते. पण अध्यक्ष जनरल याह्या खान यांनी 1 मार्च रोजी अचानक निर्णय घेऊन नियोजीत अधिवेशनाला स्थगिती दिली. या निर्णयामुळे पूर्व पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली. लोकांनी रस्त्यावर उतरून खान यांच्या निर्णयाचा निषेध केला. शेख मुजीबूर यांनी 2 मार्च रोजी ढाका आणि 3 मार्च रोजी संपूर्ण प्रांतात बंद पुकारला.


या बंदनंतर 7 मार्च रोजी मुजीबूर यांनी त्यावेळच्या रामना रेसकोर्स मैदानावर ऐतिहासिक जाहीर सभा घेतली. या मैदानाला आज  सुहरावर्दी उद्यान म्हणून ओळखले जाते. या सभेला 10 लाखांहून अधिक लोकांची उपस्थिती होती. या भाषणात मुजीबूर यांनी मांडलेल्या विचारांमुळे ते जगातील सर्वात प्रभावशाली भाषणांपैकी एक म्हणून ओळखले गेले. हेच भाषण पुढे बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत ठरले.


"हा संघर्ष आपल्या स्वातंत्र्याचा संघर्ष आहे. अशी सुरूवात शेख मुजीब यांनी आपल्या भाषणात केली. त्यांच्या याच शब्दांनी पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्याच्या युद्धासाठी तयार होण्याची प्रेरणा दिली. या भाषणानंतर केवळ 18 दिवसांनी बांगलादेश मुक्ती युद्धाला सुरुवात झाली. त्याआधी पश्चिम पाकिस्तान सैन्याने 25 मार्च रोजी पूर्व पाकिस्तानातील नागरिक, बुद्धिजीवी, विद्यार्थी, राजकारणी आणि सशस्त्र कर्मचारी यांच्याविरुद्ध ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले होते. त्यामुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचा संताप उफाळून आला होता. यातूनच मुत्की युद्धाला सुरूवात झाली. 


मुजीब यांनी केलेल्या बंगाली भाषणाची त्यावेळी कोणतीही लिखित स्क्रिप्ट उपलब्ध नव्हती. परंतु पश्चिम पाकिस्तानने त्यांच्या भाषणाच्या प्रसारणाला परवानगी नाकारल्याने लोकांनी ते रेकॉर्ड स्वरूपात प्रसारित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज ते भाषण ऑडिओ आणि व्हिडिओ व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. 30 ऑक्टोबर 2017 रोजी, UNESCO ने मुजीब यांचे हे भाषण मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये डॉक्युमेंटरी हेरिटेज म्हणून नोंदवले.


 
काय झाले होते 1971 च्या आधी? 


1966 मध्ये शेख मुजीबुर रहमान यांनी पूर्व पाकिस्तानला प्रांतीय स्वायत्तता मिळावी यासाठी सहा कलमी आंदोलन सुरू केले होते. परंतु, पश्चिम पाकिस्तानच्या लष्करी सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि शेख मुजीबवर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला अटक केली. तीन वर्षांनंतर म्हणजे 1969 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. पूर्व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील निदर्शने आणि व्यापक हिंसाचारामुळे पश्चिम पाकिस्तानला शेख यांच्यावरी देशद्रोहाचा खटला मागे घ्यावा लागला.


1970 मध्ये मुजीबच्या अवामी लीगने राष्ट्रीय निवडणुकीत 169 जागांपैसी 167 जागांवर विजय मिळवला आणि 313 जागांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमत मिळाले. परंतु पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते झुल्फिकार अली भुट्टो यांनी पूर्व पाकिस्तानी पक्षाला सरकार स्थापन करू दिले नाही. त्यांनी अध्यक्ष जनरल याह्या खान यांना पाठिंबा दिला. त्यानंतर याह्या खान यांनी रेडिओवरून 3 मार्चपासून सुरू होणारे नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन पुढे ढकलले. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून खान यांच्या निर्णयाचा निषेध केला. शेख मुजीबूर यांनी 2 मार्च रोजी ढाका आणि 3 मार्च रोजी संपूर्ण प्रांतात बंद पुकारला.


काय म्हणाले होते 7 मार्चच्या भाषणात शेख मुजीब? 
मुजीब यांनी 19 मिनिटे हे भाषण केले. त्यामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले की, हुकूमशाही आणि लष्करी हिंसाचाराने पूर्व पाकिस्तानचे शासन आणि स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न कसे अयशस्वी केले. त्याबरोबरच सविनय कायदेभंग चळवळीची घोषणा करण्यापूर्वी त्यांनी सोप्या भाषेत पश्‍चिम पाकिस्तानसोबतची त्यांची संपूर्ण राजकीय देवाणघेवाण सांगितली आणि याह्या खान अवामी लीगशी वाटाघाटी करण्यास कसे राजी नव्हते याची माहिती दिली.


“तुम्हा सर्वांना माहिती आहे की, आम्ही किती प्रयत्न करूनही ढाका, चितगाव, खुलना, रंगपूर आणि राजशाहीचे रस्ते आज माझ्या बांधवांच्या रक्ताने माखले जात आहेत आणि बंगाली लोकांकडून ऐकू येणारा हा आक्रोश म्हणजे स्वातंत्र्याचा आक्रोश, जगण्याचा आक्रोश आहे. आमच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहोत,” असे मुजीब आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले.


"भारताची फाळणी झाल्यापासून गेल्या 23 वर्षात रक्तपात आणि अश्रूंशिवाय काहीही कसे दिसले नाही. सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगच्या विजयाने आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुक्ती आणणारे घटनात्मक सरकार पुनर्स्थापित केले पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही." असे मुजीब यांनी आपल्या भाषणात सांगितले. 


मुजीब यांनी पूर्व पाकिस्तानातील लोकांना बंद करण्यास तयार राहण्यास सांगितले. शिवाय समोरून एक गोळी चालली तर प्रत्येक घरातील व्यक्तीने सैन्याप्रमाने प्रतिकार करा. असे आवाहन मुजीब यांनी नागरिकांना केले. शिवाय अवामी लीगच्या नेत्यांना शांत राहण्यास आणि चिथावणीखोरांना दूर ठेवण्यास सांगितले. त्याबरोबरच “बंगाली असो की बिगर-बंगाली, हिंदू असो की मुस्लिम, सर्व आपले बांधव आहेत आणि त्यांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे.” असे मुजीब यांनी सांगितले. 


बांग्लादेशच्या मुक्ती संग्रामच्या बातम्या प्रसारीत केल्या नाहित तर रेडिओ, टिव्ही आणि पत्रकारितेत काम करणाऱ्यांनी आपले काम थांबवावे असे आवाहन केले. त्याबरोबरच या वर्षातील आपला संघर्ष हा बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी आहे. हा लढा स्वातंत्र्याचा आहे. असे जाहीर केले.


अशेर मुजीब यांच्या संघर्षाला यश आले आणि 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ता सैन्याने भारतीय लष्कर व शेख मुजीब यांच्या कार्यकर्त्यांपुढे (मुक्ती वाहिनीचे सैनिक) बिनशर्थ शरनागती पत्करली. पाकिस्तानचे दोन भाग झाले. स्वतंत्र बाग्लादेशची निर्मिती झाली. 


संबंधित बातम्या 


50 years of Bangladesh : राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावर


Indira Gandhi | 'आयर्न लेडी' इंदिरा गांधी... केवळ चौदा दिवसांत केले पाकिस्तानचे दोन तुकडे!