Russia-Ukraine war : युक्रेन युद्धात रशियासाठी लढणारे उत्तर कोरियाचे 300 सैनिक मारले गेल्याची माहिती गुप्तचर संघटनेनं दिली आहे. तर 2700 हून अधिक सैनिक जखमी झाल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या एका खासदाराने गुप्तचर संस्थेच्या अहवालाचा हवाला देत केला आहे. खासदार ली सेओंग-क्वान यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियामधील उत्तर कोरियाच्या सैन्याची तैनाती कुर्स्क प्रदेशात वाढली आहे, असा अंदाज आहे. गुप्तचर संस्थेच्या दाव्यानुसार, युक्रेनमध्ये सापडलेल्या उत्तर कोरियांच्या सैनिकांना कैदी बनवण्याऐवजी आत्महत्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
युक्रेनमध्ये पकडलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांनी दक्षिण कोरियामध्ये आश्रय घेण्याची इच्छा व्यक्त केली नसल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनं म्हटलं आहे. नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) ने दक्षिण कोरियाच्या संसदेत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली आहे. हे सैनिक रशियाच्या कुर्स्क सीमा भागात रशियन सैन्यासोबत लढत असताना युक्रेनच्या सैन्यांनी पकडले होते.
उत्तर कोरियाने 10000 हून अधिक सैनिक पाठवल्याचा आरोप
उत्तर कोरियाने 10,000 हून अधिक सैनिक पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
युक्रेन, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने अण्वस्त्रधारी उत्तर कोरियावर रशियाशी लढण्यासाठी 10,000 हून अधिक सैन्य पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबदल्यात प्योंगयांग आणि मॉस्को यांच्यात एक करार झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाने म्हटले आहे की ते प्योंगयांगला मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि उपग्रह कार्यक्रमांसाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करेल.
युक्रेनमध्ये 2 उत्तर कोरियाचे सैनिक पकडले
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितले की, युक्रेनमध्ये उत्तर कोरियाच्या 2 सैनिकांना पकडले आहे. त्याच्या चौकशीचा व्हिडिओही त्यांनी जारी केला. पकडलेल्या युक्रेनियन सैनिकांसाठी या कैद्यांची देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे.