लंडन : ब्रिटनमधील एका भारतीय विद्यार्थिनीची मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. याचं कारण शैक्षणिक विक्रम किंवा मोठी कामगिरी नाही तर शाही ऐशोआराम आहे. 'द स्कॉटिश सन'मधील वृत्तानुसार, एका भारतीय अब्जाधीशाची मुलगी स्कॉटलंडच्या सेंड अँड्र्यूज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. मुलीच्या शिक्षणासाठी पालकांनी आलिशान महलासोबत 12 नोकरांची व्यवस्था केली आहे. या 12 जणांच्या स्टाफमध्ये विशेषत: आचारी, बटलर, मोलकरीण, घराची साफसफाई करणारा नोकर, माळी, फूटमॅन, चालक यांचा समावेश आहे.

चार वर्षांच्या अभ्यासासाठी महलासोबतच आपल्या कामात निपुण असलेल्या स्टाफच्या नियुक्तीवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. हे कुटुंब अतिशय श्रीमंत आहे, त्यामुळे फक्त अनुभवी आणि कुशल स्टाफच्या नियुक्तीवर भर देण्यात आला आहे. बटलरचं काम विशेषत: मेन्यू पाहण्याचं आणि टीम जेवण कसं बनवतेय यावर देखरेख करण्याचं असेल. तर फुटमॅनचं काम जेवण वाढण्याचं आणि टेबलाची स्वच्छता करण्याच असेल.

कुटुंबाने नोकरासाठी दिलेल्या जाहिरातीत 'आनंदी, ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण' व्यक्तीची गरज असल्याचं लिहिलं आहे. एखाद्या भारतीय विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी एवढ्या खर्चिक राहणीमानाचं हे पहिलंच उदाहरण आहे. यासोबतच पर्सनल स्टाफसाठी कामाची जी यादी आहे, त्यात गरजेच्या वेळी दरवाजा उघडणं, दुसऱ्या स्टाफसोबत रुटीन शेड्यूल बनवणं, वॉर्डरोब मॅनेजमेंट आणि पर्सनल शॉपिंगचाही समावेश आहे.

गरजेच्या वेळी कायम दरवाजा उघडण्यासाठी तयार असलेल्या स्टाफचा पगार सुमारे 30000 पौंड प्रति वर्ष आहे. या शाही खर्चावर कुटुंबांचं म्हणणं आहे की, "आम्ही एलिट क्लासचे असल्याने मुलीच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची कसर ठेवायची नाही."