French Election 2022 : फ्रान्सच्या राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीत अखेर पुन्हा एकदा इमॅन्युअल मॅक्रोन Emmanuel Macron यांनी बाजी मारली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी 54.2 टक्के मत घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. ते सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपदीपदावर विराजमान होतील. गेल्या वीस वर्षांमध्ये सलग दुसऱ्या हा बहुमान पटकावणारे ते फ्रान्सचे पहिले राष्ट्रपती ठरले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांना 41.8 टक्के मतं मिळाली. 


मरीन ले पेन यांनी पराभव स्वीकार केला आहे. त्यांनी  इमॅन्युअल मॅक्रोन यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, हा एक शानदार विजय आहे. पाच वर्षांपूर्वी देखील इमॅन्युअल मॅक्रोन यांनी  मरीन ली पेन यांना मात देत पहिल्यांदा राष्ट्रपती पदाची खुर्ची मिळवली होती. त्यावेळी त्यांचं वय 39 वर्षांचं होतं. सर्वात युवा राष्ट्रपती होण्याचा मान त्यांनी त्यावेळी मिळवला होता.  


या विजयानंतर जगभरातून फ्रान्सचे राष्ट्रपती  इमॅन्युअल मॅक्रोन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ट्वीट करत  इमॅन्युअल मॅक्रोन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की,  इमॅन्युअल मॅक्रोन, तुम्हाला फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा. फ्रान्स आमचा सर्वात जवळचा आणि महत्वाचा सहयोगी आहे. मी आपल्या दोन्ही देशासाठी महत्वाच्या मुद्द्यांवर काम पुढे सुरु ठेवण्यासाठी इच्छुक आहे.




इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी यांनी देखील  इमॅन्युअल मॅक्रोन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, फ्रान्सच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत  इमॅन्युअल मॅक्रोन यांचा विजय यूरोपसाठी चांगली बातमी आहे.