Ayurvedic Health Tips : फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि यामुळेच आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर दररोज किमान एक फळ खाण्याचा सल्ला देतात. विशेषत: हंगामी फळे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. पण फळे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने न खाल्ल्यास फळे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. योग्य वेळी फळे खाल्ली नाहीत, तर ती खाण्याचा फायदा शरीराला मिळत नाहीच, याशिवाय आरोग्यालाही हानी पोहोचू शकते.


चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने होतील समस्या


आयुर्वेदानुसार फळे खाण्याची योग्य वेळ सांगण्यात आली आहे. या वेळेचे पालन केल्यास तुम्हाला फळांचे सेवन करण्याचा फायदा मिळतो. फळांचे सेवन करण्याची योग्य वेळ दुपारी आहे. दिवसाच्या सुरुवातीला म्हणजेच, सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर फळे खाऊ नयेत. आयुर्वेदाचार्य आणि आहारतज्ज्ञ दुपारी 4 नंतर फळे खाण्यास मनाई करतात. फळे खाताना या गोष्टींची काळजी न घेतल्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.


दुपारनंतर फळे खाल्ल्याने 'या' समस्या उद्भवतात



  • गॅस

  • पोट फुगणे

  • अपचन 

  • ओटीपोटात जडपणा

  • जेवण झाल्यावर लगेचच झोप येणे

  • ढेकर येणे


फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?


फळे खाण्याची योग्य वेळ दुपारी आहे. तुम्ही सकाळी न्याहारी आणि दुपारच्या जेवणादरम्यान म्हणजेच दुपारी 11-12 च्या दरम्यान फळे खाऊ शकता. यानंतर, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या मधल्या वेळेत 3 ते 3:30 वाजता फळे खा. सूर्यास्तानंतर फळे खाऊ नका.


सूर्यास्तानंतर फळे का खाऊ नयेत?



  • फळांमध्ये साखरेचे प्रमाणही अधिक असते. यामुळे पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. फळांचं पचन योग्य प्रकारे झालं नाही तर, यामुळे शरीरात आम्ल पित्ताची समस्या होऊ शकते. यामुळेच अपचन, गॅस, करपट ढेकर अशा समस्या जाणवतात.

  • दुपारी 4 नंतर सूर्य मावळण्याची वेळ असते. यासोबतच आपले जैविक घड्याळही बदलू लागते. आपले शरीर हळूहळू शांत आणि झोपण्याच्या स्थितीकडे जाऊ लागते. अशा परिस्थितीत थंड फळे पचवण्यासाठी शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळत नाही आणि यामुळे अपचनाचा त्रास सुरू होतो.

  • आयुर्वेदानुसार, दुपारी 4 नंतर फळांचे सेवन केल्याने शरीरामध्ये वात आणि कफ वाढतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Health Tips : तुम्हीही वॉक करताना 'या' चुका करताय?, आरोग्यावर होईल वाईट परिणाम