Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency) आज मतदान (Voting) प्रक्रिया सुरु असताना उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) मतदानाचा हक्क बजावत असताना खोली क्रमांक चुकल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी तात्काळ दुरुस्त करुन पाटील यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला.


नाशिक पदवीधर मतदारसंघात इतर चार मतदारसंघात आज निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी आठ वाजता निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. अशातच एक तास होताच नाशिक मतदारसंघातील धुळे येथील मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. यावेळी उमेदवार शुभांगी पाटील या मतदानासाठी गेल्यानंतर खोली क्रमांक चुकल्याचे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ दुरुस्ती करुन मतदान सुरळीत करण्यात आले. 


चुकीमुळे शुभांगी पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले


यावेळी शुभांगी पाटील यांनी मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर हा गोंधळ लक्षात आला. दुरुस्ती केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र झालेल्या चुकीमुळे त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान मतदान झाल्यानंतर त्या म्हणाल्या की, "मी पदवीधर असल्याचा गर्व असून आज मतदानाचा हक्क बजावला आहे. माझे अनेक भाऊ, बहिणी पदवीधर आहेत, मी शिकलेली आहे. मी आज मतदानाचा हक्क बजावला." "मी घराबाहेर पडले, तुम्ही देखील बाहेर पडा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


मतदानाआधी एकविरेचे दर्शन...


महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज धुळे शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक आठ येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी शुभांगी पाटील यांनी खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले. मतदान केंद्रावर आल्यानंतर शुभांगी पाटील यांना आपला मतदान क्रमांक मिळत नसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर 15 ते 20 मिनिटांनंतर मतदान क्रमांक मिळाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत आपला विजय निश्चित होणार असून 2 तारखेला विजयाचा जल्लोष आपणच साजरा करणार असल्याची प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


VIDEO : Shubhangi Patil Voting : मविआ उमेदवार शुभांगी पाटील मतदान केंद्रावर, खोली क्रमांक चुकल्याने गोंधळ



नाशिक पदवीधर मतदारसंघ


विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज मागे घेतला आणि त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.