नागपूर : दरवर्षी पावसाळा संपताना धरणामध्ये किती साठा ठेवावा याबाबतचे नियोजन केले जात असते. काही धरणे 100 टक्के भरली नसताना देखील पाणी सोडल्या जाते. कारण नंतर पाणी किती येईल याचा अंदाज नसतो. खूप वर्षाच्या अभ्यासानंतर कोणत्या महिन्यात किती साठा ठेवावा याचे एक तंत्र विकसित होते. त्यानुसार धरणामधील क्षमता निश्चित केली जात असल्याचे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी केले. नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने व महाआयटीच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित वेबवार्ता चर्चेत ते बोलत होते. 'नागपूर जिल्ह्यातील जलसाठे व पावसाळ्यातील व्यवस्थापन' या विषयावर त्यांनी आज निवेदन केले.


आमची धरणे, बॅरेजेस, तलाव, हे आमचे जीवनदायी वैभव आहे. त्यांचे रक्षण हे केवळ एका विभागाची किंवा प्रशासनाची ही जबाबदारी नाही. ही सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे जलसाठ्यांच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि संनियंत्रणासाठी प्रशासनासोबत सर्वांनीच जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 


जिल्हाधिकारी आर.विमला यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोशन हटवार ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यामध्ये 5 मोठे, 12 मध्यम  व 60 लघु प्रकल्प मिळून 77 प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. नैसर्गिक साठ्यांची देखील उपलब्धता भरपूर आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी या साठ्याचे संरक्षण करणे, त्यासाठी संरक्षण भिंती उभारणे, कुंपण उभारणे व अन्य उपाययोजना करणे प्रत्येकवेळी शक्य होणार नाही. हे पाणीसाठे मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला होणे खूप गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


नागपूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या साठ्यांबाबत निर्णय घेताना नागपूरकडे वाहणाऱ्या नद्या व त्यांच्या पाणी ग्रहण क्षेत्रात पडणारा पाऊस याबाबत आंतरराज्य संपर्क ठेवला जातो. ठराविक अंतरानंतर सरिता मोजणी केंद्र असतात. त्या मार्फत पाणीसाठ्याच्या संदर्भात अभ्यास केला जातो. ज्या ठिकाणी गेट नसेल त्या ठिकाणी सांडव्यावरून पाणी किती गेले याबाबतची मोजणी करण्याचे तंत्र देखील असते असेही त्यांनी सांगितले.


रेड, ऑरेंज, येलो अलर्ट म्हणजे...


यावेळी त्यांनी पर्जन्यमान अलर्ट व त्याची मोजणी याबाबतचे विश्लेषण केले. रेड अलर्ट म्हणजे 20 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस, ऑरेंज अलर्ट म्हणजे सहा ते वीस सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस, आणि येलो अलर्ट म्हणजे सहा सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी श्रोत्यांना सांगितले. नागपूर जिल्ह्यातील 71 प्रकल्प दरवाजे नसणारे आहे. सांडव्यावरून पाणी भरणे आहे.सध्या 100 टक्के पाणी सर्वच प्रकल्पात भरलेले नाही ,असे त्यांनी स्पष्ट केले. दुर्घटने संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली. पाण्याशी कोणी खेळू नये. ती फार मोठी शक्ती असते त्यामुळे पुलावरून पाणी थोडे जरी जात असले तरी त्याच्या प्रवाहातली ताकद लक्षात येत नाही त्यामुळे वाहत्या पाण्यामध्ये हाराकिरी करून आपला जीव गमावणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी येणारे संदेश जागरूकपणे समजून घेणे आवश्यक आहे पावसाळ्यामध्ये परवानगी नसेल तर कोणत्या जलसाठ्याच्या भागात प्रवेश करू नये सेल्फीच्या नादात आपला जीव गमावू नये असा संदेशही त्यांनी शेवटी आपल्या निवेदनात दिला. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.