Uday Samant In Ratnagiri : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या जवळचे असलेले रत्नागिरी - संगमेश्वर मतदारसंघातील शिवसेना आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) शिंदे गटात जाणार नाहीत अशी अटकळ होती. पण, उदय सामंत अखेर शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर उदय सामंत आपल्या रत्नागिरी जिल्ह्याील मूळ गावी आज येत आहेत. पाली गावातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषदेचे देखील आयोजन केले आहे. दरम्यान, यावेळी सामंत यांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन केलेले नाही. ते मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय देत आहेत. पण, सध्याचं राजकीय वातावरण पाहता आयोजित पत्रकार परिषदेत सामंत काय बोलणार? हे पाहावं लागणार आहे. कारण, शिवसेना खासदार आणि सचिव विनायक राऊत यांनी सामंत यांच्यावर गद्दार आणि उपरे अशी टिका रविवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात केली होती. त्याला सामंत काय उत्तर देणार? त्यावर भाष्य करणार का? हे देखील पाहावं लागणार आहे. शिवसेनेचे जुने - जाणते अद्याप तरी शिवसेनेत आहेत. पण, आगामी काळात गणितं बदलू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. मुख्य बाब म्हणजे विनायक राऊत यांनी टीका केल्यानंतर उदय सामंत यांनी त्याला संयमानं उत्तर दिले होते. विनायक राऊत यांचे गैरसमज एक दिवस नक्की दूर होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. शिवाय स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी आपली भूमिका देखील एका पत्राद्वारे मांडली होती. 



'किंगमेकर'मुळे गणित बदलणार?

 


उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. पण, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांना मानणारा वर्ग देखील रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात आहे. उदय सामंत आमदार असले तरी त्यांचे वडिल आणि भाऊ यांचं मतदारसंघावर लक्ष असते. कार्यकर्त्यांशी ते स्वत: संवाद साधत असतात. सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना किंगमेकर म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे शिवसेनेनं शक्तीप्रदर्शन केल्यानंतर देखील उदय सामंत मतदारसंघात आल्यानंतर गणितं बदलू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, 'किंगमेकर' म्हणून ओळखले जाणारे किरण सामंत देखील पडद्यामागून सर्व सुत्र हलवण्यात माहिर असून त्यांच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. निर्धार मेळाव्यानंतर सामंत यांच्याकडून देखील समर्थकांशी संवाद साधला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार उदय सामंत मतदारसंघात परतल्यानंतर काय घडामोडी होतात? याकडे सध्या सर्वाचं लक्ष आहे. 

 

'आम्ही सेनेसोबतच'

दरम्यान, शिंदे गटात सामील होण्यापूर्वी उदय सामंत यांनी आपल्या पाली या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. शिंदे गटात सामील होण्याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. पण, यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शिंदे गटात सामील होण्यास विरोध दर्शवला होता. तसेच, आपला पाठिंबा या भूमिकेला नसणार हे देखील सांगितले होते. दरम्यान, यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला देखील दिसून आले होते. असं असलं तरी आगामी काळात कार्यकर्त्यांच्या भूमिका बदलू शकतात अशी चर्चा केली जात आहे. पण, सध्या शिवसेनेसोबत असलेले किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी उदय सामंत यांना आपला पाठिंबा दर्शवतात? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 

 

राऊतांकडून गद्दार, उपरा म्हणून टिकेचे बाण!

रविवारी शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी उदय सामंत कशाप्रकारे विश्वासघात केला याची माहिती दिली होती. राऊत यांनी यावेळी जबरदस्त शाब्दिक प्रहार उदय सामंत यांच्यावर केले. आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात केल्याची भावना देखील यावेळी विनायक राऊत यांनी बोलून दाखवली होती. शिवाय, उदय सामंत यांच्यावर गद्दार, उपरा म्हणून देखील टिकेचे बाण सोडले होते. 

 

राऊतांनी सोडले कार्यालय!

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर स्थानिक पातळीवर देखील सध्या नेते आणि कार्यकर्ते यांच्यात कटुता दिसून येत आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील संपर्क कार्यालय सोडले आहे. सामंत यांच्याशी या कार्यालयाचा संबंध असल्यानं ते कार्यालय सोडले गेले आहे. सध्या शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या कार्यालयातून कामकाज केले जात आहे.